Pimpri Lockdown Update: कोरोना ‘ब्रेक’नंतर महापालिकेचे कामकाज पूर्ववत; नागरिकांना ‘या’ वेळेत मिळणार प्रवेश

Pimpri Lockdown Update: PCMC resumes operations after Corona 'break'; Citizens will get access at 'this' time

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के उपस्थितीचा नियम रद्द करुन 100 टक्के उपस्थितीत पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने महापालिकेचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे. आवश्यकेतनुसार सकाळी 8 ते रात्री 8 वेळेमध्ये कार्यालय चालू ठेवावे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अगोदर 50 टक्के आणि नंतर 5 टक्क्यांवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती आणली होती.  परंतु, राज्य सरकारने 19 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले आहे. त्यामुळे महापालिकेतील 100 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश आले आहेत. त्यानुसार सुरक्षित अंतराचे पालन करून कार्यालये सुरु केली जाणार आहे.

कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतराचे पालन करावे. कर्मचारी संख्या जास्त असलेल्या विभागांनी आवश्यकतेनुसार सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यालय चालू ठेवावे. विभागस्तरावर कामाचे नियोजन करावे. अत्यावश्क सेवा, शिफ्ट ड्युटीमधील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत कोणताही बदल केला जाणार नाही.

महापालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये नागरिकांना फक्त दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांशी संबंधित कामकाज आहे. अशा कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. महिला कर्मचाऱ्यांची सायंकाळी 6.15 कार्यालयीन वेळ संपुष्टात येईल. ज्या विभागप्रमुखांकडे नागरिकांशी संबंधित कामकाज आहे. त्यांनी विभागाकडे येणाऱ्या नागरिकांची कामे मुदतीत व प्राधान्याने करावीत. कामकाज प्रलंबित राहिल्याच्या तक्रारी आल्यास त्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय, तातडीचे अपवादात्मक कारणे वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करण्यात येवू नये.

विभागप्रमुख्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. जे कर्मचारी मुख्यालय सोडून बाहेरगावी गेले असतील. त्यांना विभागप्रमुखांनी त्वरित कर्तव्यावर हजर राहण्याच्या लेखी सूचना द्याव्यात. त्यानंतरही जे कर्मचारी हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी. कार्यालयातील उपस्थिती 100 टक्के राहील. याची विभागप्रमुखांनी खबदरारी घ्यावी. तपासणी पथकामार्फत केलेल्या तपासणीत अनुउपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.