Pimpri: लॉकडाऊन! कामगार दुचाकीवरूनही कामावर जावू शकणार पण वाहन परवाना, ओळखपत्र बाळगणे बंधनकारक

Pimpri: Lockdown! Workers can also go to work on a two-wheeler, but it is mandatory to carry a driving license and identity card उद्योजकांच्या मागणीनंतर उद्योग, कारखाने, कंपन्यांना लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – कामगारनगरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. या काळात कामगार आपल्या दुचाकीवरून देखील कामावर जावू शकणार आहेत, असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीत जाताना वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर घेतलेला असावा. कामावर जाताना-येताना ओळखपत्र, वाहन परवाना बाळगणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले.

औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणणे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून 23 जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर लॉकडाउन असणार आहे. दरम्यान, उद्योजकांच्या मागणीनंतर उद्योग, कारखाने, कंपन्यांना लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे.

या कालावधीतही सर्व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. या आस्थापना मधील कार्यरत अधिकारी, कामगारांना एचआर विभाग प्रमुखांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरिता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

कंपनी, खासगी मोटार किंवा दुचाकीवरून देखील कामावर जाता येईल. परवाना देताना कर्मचा-याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कर्मचा-याचा आयडी क्रमांक, वाहनक्रमांक, कोठून कोठे, कामाची वेळ देण्यात यावी. हा पास 23 जुलैपर्यंत वैध राहील. पासचा दुरुपयोग झाल्यास तात्काळ रद्द करण्यात येईल.

कंपनीकडून देण्यात आलेल्या परवान्यांची माहिती पोलीस आयुक्त, पोलीस स्टेशन प्रभारी यांना सादर करावी. तसेच कंपनीकडून देण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 [email protected] आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 [email protected] या मेलवर पाठविण्यात यावी.

कामगारांनी कामावर जाताना व परत येताना प्रवासा दरम्यान कंपनीचे ओळखपत्र व कंपनीकडून पुरविण्यात आलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आला आहे.

तथापी, ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोविडचा रुग्ण आढळून आल्यास बाधित कामगार, अधिकारी कार्यरत असलेल्या युनीटमधील सर्व कामगारांची कोविडची तपासणी स्व:खर्चाने करणे बंधनकारक राहील.

दरम्यानच्या कालावधीत संबंधित युनिट बंद ठेवण्यात यावे. चाचणी आणि संबंधित युनिटचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यानंतरच ते परत कार्यान्वित करावे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीसच फक्त कामावर उपस्थित राहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.