Pimpri : भगवान बुद्धांचे उपदेश मराठीत करण्याचा सामंजस्य करार

आमदार चाबुकस्वार यांच्या प्रयत्नांना यश 

एमपीसी न्यूज – भगवान बुद्धांचे तत्वज्ञान, उपदेश पाली लिपीतून मराठीत भाषांतर करण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बार्टीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.

भगवान बुद्धांचा नष्ट झालेला साहित्यिक तसेच सांस्कृतिक वारसा भारतात पुन्हा एकदा प्रस्थापित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.बार्टीचे महासंचालक, कैलास कणसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू, डॉ. नितीन करमळकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून या ऐतिहासिक कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार ऍंड .गौतम चाबूकस्वार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक, प्रफुल्ल पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पालि विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टडी सेंटरचे संचालक, डॉ. विजय खरे, बार्टीच्या प्रकाशन व प्रसिदधी विभागाच्या प्रकल्प संचालक, आरती डोळस व भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टीटयूट चे मानद सचिव श्रीकांत बहुलीकर आदी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी पाच कोटी रूपयांचा एकरकमी निधी सामाजिक न्याय विभागाकडून मंजूर करून घेण्यामध्ये पिंपरीचे आमदार ऍंड.गौतम चाबुकस्वार यांनी विशेष प्रयत्न केले होते. आमदार चाबुकस्वार हे स्वत: पालीचे प्राध्यापक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागात ते अध्ययनाचे कार्य करतात.

पाली लिपीच्या मराठी भाषांतराचा पहिला संघटित उपक्रम या प्रकल्पाच्या रूपाने हाती घेण्यात आला असून विपस्सना विशोधन विन्यास, इगतपुरी यांनी प्रकाशित केलेल्या पाली लिपीतील सुलपिटक, विनयपिटक, व अभिधम्मपिटक यांचे जवळजवळ 25 हजार पानी मराठी भाषांतर या प्रकल्पाद्वारे पाच वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेमध्ये भगवान बुद्धांचा उपदेश समजून घेण्याची निर्माण झालेली इच्छा केवळ या प्रकल्पामुळे पुरी होईल असे नव्हे तर यामुळे मराठी भाषा व मराठी साहित्याचा शब्दसंग्रह व आशय या दृष्टीने समृद्ध होणार आहे. विविध संस्कृतींना जोडण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्टदेखील या प्रकल्पाने साध्य होईल. या प्रकल्पाचे एक फलित म्हणून भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्राचीन भाषांच्या कुशल भाषांतरकारांची एक फळी तयार होईल. याचा आणखी एक फायदा म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र विद्वज्जगताच्या नकाशावर येण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.