Pimpri : तीन महिन्यांपूर्वी हरवलेले गंठण आणि रोकड प्रामाणिक नागरिकाने केली परत

Lost knots and cash lost three months ago by an honest citizen

एमपीसी न्यूज – एका महिलेचे गंठण आणि रोख रक्कम ठेवलेली पर्स तीन महिन्यांपूर्वी हरवली होती. ती पर्स सापडल्यानंतर प्रामाणिक नागरिकांनी तीन महिने शोध घेऊन पर्स महिलेला परत केली.

शकुंतला बलभीम भानवसे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांची पर्स 21 मार्च 2020 रोजी सायंकाळच्या वेळी पिंपळे गुरव मधील रस्त्यावर पडली. त्या पर्समध्ये पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे गठंण होते. ही पर्स पिंपळे गुरव येथील रहिवासी नासिर खान आणि ताहीर शेख यांना  सापडली.

सापडलेल्या पाकीटावर सोनाराच्या दुकानाचा शिक्का होता. मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी खान आणि शेख यांनी सोनाराचे दुकान शोधले. त्यावरून सोन्याच्या दागिन्याची पावती शोधून शकुंतला भानवसे यांचा शोध सुरू केला.

यासाठी त्यांनी इंद्रायणी नगर, भोसरी येथील समता विकास मंडळाचे अध्यक्ष रामदास जाधव, म्हस्के काका, अरुण चव्हाण यांची मदत घेतली.

हा शोध तब्बल तीन महिन्यानंतर संपला. 21 जून रोजी इंद्रायणी नगर मधील गणेश मंदिरात सापडलेले सोने आणि रोख रक्कम खान आणि शेख बंधूंनी मूळ मालकीण भानवसे यांना परत केले.

यावेळी कैलास गोरडे, नासीर खान, ताहेर शेख, अन्वर सय्यद, रामदास जाधव, अरुण चव्हाण, शशिकांत गुजर, श्रीपाल ज्वेलर्सचे ओंकार आदि उपस्थित होते.

खान आणि शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू तब्बल तीन महिन्यानंतर परत मिळाल्याने शकुंतला भानवसे यांना भरून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.