Pimpri : श्रीमंत महापालिकेचा गाडा हाकणार विलास मडिगेरी

एमपीसी न्यूज – भाजपचा स्वच्छ चेहरा, चांगली प्रतिमा असलेले विलास मडिगेरी हे आता 6 हजार 183 कोटीचे बजेट असलेल्या श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गाडा हाकणार आहेत. मडिगेरी यांच्या रूपाने महापालिका इतिहासात पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाला स्थायी समितीच्या सभापतीपदी बसण्याचा बहुमान मिळाला आहे.

विलास मडिगेरी हे भाजपचे निष्ठावान, जुने आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्यासोबत मडिगेरी यांनी काम केले आहे. पक्षाच्या प्रतिकूल काळात संघटना मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. संघटनेत उपाध्यक्ष, सरचिटणीस पदावर काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील त्यांचे उत्तम संबंध आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या इंद्रायणीनगर परिसरातून सलग तीनवेळा निवडून येत आहेत. दोनवेळा त्यांच्या पत्नी वर्षा मडिगेरी आणि आता तिस-या वेळी ते स्वत: मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही. कोणत्याही वादात अडकले नाहीत. भाजपचा स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या वर्षी त्यांनी स्थायी समिती सदस्य म्हणून एक वर्ष काम केले आहे.

शीतल शिंदे, संतोष लोंढे, आरती चोंधे सभापतीपदाच्या शर्यतीत असताना निष्ठावान म्हणून विलास मडिगेरी यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. त्यामुळे इंद्रायणीनगर प्रभाला स्थायी समितीचे अध्यक्षपद दुस-यांदा मिळाले आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत विश्वासु सहकारी म्हणून मडिगेरी ओळखले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.