Pimpri: ‘मनसे’चे इंजिन धावेना अन्‌ ‘आरपीआय’चा झेंडा फडकेना

(गणेश यादव)

सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील जनतेवर प्रभाव पडला आहे का ?, यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सरस कामगिरी करीत आपल्या कार्यशैलीची चुणूक भाजपने दाखवली आहे का ? सध्या विरोधी पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात किती यश आले आहे ?, काँग्रेस, शिवसेना मनसे या पक्षांचे शहरातील अस्तित्व दखल घेण्याजोगे आहे का ? या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकणारी एक मालिका सुरु केली आहे. त्याचा हा पाचवा आणि शेवटचा लेख…..

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची पिंपरी-चिंचवड शहरात ब-यापैकी ताकद आहे. पक्षाच्या नेत्यांना आपली ताकद कायम ठेवण्यात मात्र अपयश येत आहे. मनसेचे शहराध्यक्षच एकमेव नगरसेवक असून पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर, महापालिकेत आरपीआयचा एकही नगरसेवक नसून शहराध्यक्षपदाचा वाद सुरुच आहे. मनसेचे इंजिन धावेना अन्‌ आरपीआयचा झेंडा फडकेना अशी या दोन्ही पक्षाची अवस्था आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मनसेची मर्यादित ताकद आहे. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शहरात मनसेचा करिष्मा वाढला होता. शहरातील तरुण वर्ग मनसे या पक्षाकडे आकर्षित झाला होता; मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाला गळती लागली. त्यामुळे शहरातील पक्ष संघटना कमकुवत होवू लागली. परिणामी, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेला महापालिका निवडणुकीत सचिन चिखले यांच्या रुपाने मनसेचा एकमेव नगरसेवक निवडून आला. चार नगरसेवकांवरुन मनसेचे संख्याबळ एकवर आले. महापालिकेतील पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहा जणांची कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये एक शहराध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघनिहाय तीन उपशहराध्यक्षांचा समावेश आहे.

नगरसेवक सचिन चिखले यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. शहराध्यक्षपद मिळाल्यानंतर चिखले यांनी विविध प्रश्नांवर आंदोलने केली. परंतु, त्यांना कार्यकर्त्यांची साथ मिळत नव्हती. त्यानंतर चिखले यांनी आंदोलने देखील करणे कमी केले. तसेच महापालिकेत एकमेव नगरसेवक असलेल्या चिखले यांची भूमिका नेहमीच ‘गोलमाल’ असते. ते कधी सत्ताधा-यांच्या विरोधात बोलतात. तर, कधी कौतुक करतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत नेहमीच संशय व्यक्त केला जातो. मनसेची संघटना कमकुवत होत असून शहरात ‘मनसे’चे इंजिन धावेना झाले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची पिंपरी मतदार संघात ताकद आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव झाला होता. भाजपसोबत युती असतानाही त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक न लढता ‘शिलाई’ मशिनच्या चिन्हावर निवडणूक लढविली. त्याचा त्यांना फटका बसला. केवळ अडीच हजारांच्या मताने पराभवाला सामोरे जावे लागले. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी देखील आरपीआयने भाजपसोबत युती केली. आरपीआयच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडूक लढविली. त्यामध्ये बाळासाहेब ओव्हाळ हे एकमेव नगरसेवक निवडून आले. दापोडी परिसरातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा मात्र पराभव झाला.

गेल्या काही दिवसांपासून पक्षात वादावादी सुरु आहे. नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षाने ओव्हाळ यांचा आरपीआयशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले होते. त्यावर आपण आरपीआयमध्येच असून रामदास आठवले यांचा कार्यकर्ता असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले.

शहराचे पक्ष निरीक्षक एम. डी. शेवाळे यांनी मे महिन्यात बैठक घेत पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर समन्वय समितीच्या माध्यमातून काम पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी अर्ज मागविले होते. परंतु, पुन्हा पक्षाने असे अर्ज मागविले नसल्याचे पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पक्षात शहराध्यपदाचा घोळ सुरु आहे. या पक्षांअतर्गत वादामुळेच शहरात आरपीआयचा झेंडा फडकेनासा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.