Pimpri : श्रमदानाचा ‘कपल डे’; गंगाखेडला जोडप्यांनी केले श्रमदान, लग्नाचा वाढदिवसही बांधावर केला साजरा

एमपीसी न्यूज – पाणी फाऊंडेशनच्या वतीने श्रमदानाचा कपल डे आज, शुक्रवारी साजरा करण्यात आला. यात गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथे परभणी लोकसभा अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जोडप्यांने श्रमदान करत या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. वाघलगाव येथे जोडीने श्रमदानात सहभागी झालेले काँग्रेस तालुकाध्यक्ष, जलमित्र गोविंद यादव यांच्या लग्नाचा वाढदिवस बांधावरच आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आता भलती रंगत आली आहे. गंगाखेड तालुक्यातील गावागावांतील अबालवृद्ध राजकारण, गट-तट बाजूला ठेवून श्रमदानात सहभागी होत आहेत. यातून बांधबंदिस्ती, नवीन तळे, दुरूस्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत. पाणी फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सध्या श्रमदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत आज कपल डे साजरा करण्यात आला. यात बहुसंख्य जोडपी आजच्या श्रमदानात सहभागी झाली होती.

डोंगरजवळा येथील महाश्रमदान कार्यक्रमात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर हे आपल्या नियोजित वधुसह तर पंचायत समिती उपसभापती सारिका शेंडगे या आपले पती माधवराव शेंडगे यांचेसह श्रमदानात सहभागी झाले होते. इतरही बहुसंख्य जोडप्यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवला.

वाघलगाव या छोट्याश्या गावात काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पत्नी वर्षा यांचेसह श्रमदान केले. गावच्या सरपंच सीमाताई आपले पती नारायण घनवटे यांचेसह तर धनगर समाजाचे नेते सखाराम बोबडे आपल्या सौभाग्यवती अलकाताई यांचेसह श्रमदानात सहभाग घेतला. श्रमदान स्थळी बांधावरच यादव यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. महिलांनी गाणी गौण उखाणे घेत वर्षा व गोविंद यादव यांना शुभेच्छा दिल्या. यादव यांच्या वतीने याठिकाणी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ सुभाष कदम, सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपवळे, माजी उपसभापती मंजुषा जामगे, नगरपरिषदेच्या प्रकल्प संचालक अंजना कुंडगीर, मुख्याध्यापिका अर्चना जोशी, लायनेस अध्यक्षा संगीता जामगे, सुनीता घाडगे, श्रीमती महातपुरीकर, रेघाटे काकु, पांडूरंग घनवटे, जळबाजी घनवटे, महादू घनवटे, बालाजी घनवटे, सतीष अळनूरे आदिंसह गंगाखेड हून आलेले आणि वाघलगाव गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदानात सहभाग घेतला. पाहुण्यांचे वाजत – गाजत स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.