Pimpri: महायुतीला बंडखोरीचे ग्रहण!; भाजप, आरपीआयने देखील भरला अर्ज

राष्ट्रवादीतही होणार बंडखोरी?

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी आज (गुरुवारी) आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, पिंपरीत महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, भाजपचेच नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. त्यामध्ये महायुतीने शहरातील तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली असून चाबुकस्वार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने नाराज झालेले अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचेच नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी देखील बंडखोरी केली आहे. त्यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या आरपीआयच्या सचिव चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील बंडखोरी केली आहे. सोनकांबळे यांनी मागील पंचवार्षिक निवडणूक भाजप-आरपीआयकडून लढविली होती. यावेळी महायुती झाल्याने मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. त्यामुळे सोनकांबळे यांनी देखील बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

राष्ट्रवादीतही होणार बंडखोरी?
राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी संत तुकारामनगरच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ देखील बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पक्षाची उमेदवारी जाहीर होताच दोघांनीही पत्रकारपरिषेद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. तर, आघाडी असतानादेखील काँग्रेसचे पदाधिकारी भाजपच्या बंडखोरांचा अर्ज भरताना त्यांच्यासोबत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like