Pimpri – लोकशाहीच्या उत्सवात महायुती विजयी होणार – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज- येणारी लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचा विजय होणार आहे. असा विश्वास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केला.

आकुर्डी येथे भारतीय कामगार सेनेचा पिंपरी चिंचवड शहर मेळावा गुरुवारी (दि. 18) पार पडला. या मेळाव्यात कामगार नेते इरफान सय्यद बोलत होते. शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सल्लागार मधुकर बाबर, शहर प्रमुख योगेश बाबर, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे आदी उपस्थित होते.

  • इरफान सय्यद म्हणाले, “महायुतीची देशाला गरज आहे. देशहितासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणे आवश्यक आहे. मावळ लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची आहे. महायुतीकडे मोठ्या प्रमाणात जनशक्ती आहे. त्यामुळे विरोधक धनशक्तीचा वापर करण्याची शक्यता आहे. मतदारांना देशहितासाठी सावध राहून योग्य भूमिका बजावण्यासाठी तयार करण्याचे आवाहन देखील सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केले.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहर कामगारांनी वसवलेलं आहे. त्यामुळे या नगरीला कामगार नगरी म्हणून ओळखले जात आहे. कामगार जे ठरवतील तेच होणार, हा आपल्या देशाला इतिहास आहे. आता कामगारांनी महायुतीला विजयी करण्याचे ठरविले आहे. देशात गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या. उज्वला योजना, आवास योजना अशा अनेक योजना सांगता येतील. सर्व योजना समाजाच्या सर्व स्तरावर पोहोचल्या आहेत. कामगार वर्गाला या योजनांचा मोठ्या प्रमाणात झाला आहे. देशाच्या सीमेवर ज्याप्रमाणे सदासर्वकाळ सैनिक उभा ठाकलेला असतो, त्याचप्रमाणे महायुतीने देशाची आर्थिक ताकद, जगातील भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.”

  • भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे म्हणाले, “भारतीय कामगार सेनेची मुंबई येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात सर्वसाधारण सभा होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात कामगार मेळावा घेण्यात येते. या कामगार मेळाव्यात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देताना अभिमान वाटत आहे. बारणे हेच येत्या निवडणुकीत जिंकणार आहेत. कामगारांनी महायुतीच्या उमेदवाराला मत देऊन विजयी करावे. बारणे यांनी मागील पाच वर्षात केलेले काम सर्वांपर्यंत पोहोचवावे. जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर देखील सर्वांनी भर दिला पाहिजे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.