Pimpri : मैत्रीणी कट्टातर्फे मृत्युपत्र आणि मिळकत विषयक कायद्यांवर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- मृत्युपत्र आणि मिळकत विषयक कायद्याचे ज्ञान सर्वांना असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कमावण्याचा आणि पुढील पिढीला देण्याचा प्रयत्न करतो. पण फसवणूक आणि विश्वासघातकी प्रवृत्तींमुळे मृत्युपत्राच्या माध्यमातून योग्य व्यक्तीपर्यंत मिळकतीचे अधिकार गेल्यास हा प्रयत्न सफल होतो. हा धागा पकडून मैत्रिणी कट्टातर्फे मृत्युपत्र आणि मिळकत विषयक कायद्यांवर मार्गदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल यांनी मार्गदर्शन केले.

माउली उद्यान सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या निर्मल कौर भोगल, रो. अॅड. अर्जुन दलाल, माजी नगरसेविका भारती फरांदे, मैत्रीणी ग्रुप च्या भारती फरांदे, प्रतीक्षा मिरजी, आशा पोलकडे, श्रीदेवी नरूणी, रेखा कदम, श्रध्दा कापडे, विजया नेहते, भारती सारडा, माधुरी चौधरी, प्रतिभा सुर्वे, प्रतिभा पेठकर, स्वाती काळभोर आदी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांची प्रश्नोत्तरे आणि मार्गदर्शन या स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमात अॅड. प्रतिभा जोशी दलाल म्हणाल्या, “आयुष्यातला प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो. हसत खेळत सुरु झालेले बालपण तारुण्यावर आणून सोडते. तारुण्यात शिक्षण आणि नोकरी आणि आयुष्य स्थिर करण्याचे वेध लागतात. उतारवयात आयुष्यभर कमावलेल्या बौद्धिक आणि आर्थिक संपत्तीचे उत्तराधिकारी स्वतःला नेमता यावे. तसेच आपल्या संपत्तीवर कोणाचा किती अधिकार असावा याबाबत मृत्युपत्र हा सर्वोत्तम उपाय आहे.

मृत्युपत्र हे लेखी आणि उद्देश स्पष्ट करणारे असायला हवे. मृत्युपत्र मृत्यूपश्चात उघडले जाणार असल्याने त्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी दोन साक्षीदारांची आवश्यकता असते. आपला अंत कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मृत्युपत्र वेळोवेळी बदलता देखील येते. अशा प्रसंगात शेवटी केलेले मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. मृत्युपत्राची अंमलबजावणी योग्य व्यक्तीमार्फत व्हावी, असे वाटत असल्यास व्यवस्थापकाची देखील नेमणूक करता येते. मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य नाही. पण तरीही काळाची गरज, सत्यता आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यास सोयीस्कर होते. अशा अनेक पैलूंवर अॅड. प्रतिभा यांनी प्रकाश टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.