Pimpri: आयुक्तांच्या साथीने भाजप पदाधिकाऱ्यांचा कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या थेट खरेदीत मोठा भ्रष्टाचार; दत्ता साने यांचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आयुक्तांची तक्रार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आपत्तीचा गैरफायदा घेत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या सहाय्याने सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी कोरोनासाठीच्या थेट खरेदीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. या माध्यमातून महापालिका तिजोरीवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी केली आहे.

तसेच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयुक्तांची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे कोरोनासंदर्भातील थेट खरेदीची संपुर्ण माहिती मागविली आहे. साने यांनी पत्रात म्हटले आहे की,  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापर्यंत किती मास्क , सँनिटायझर आणि इतर वस्तू  खरेदी केल्या? कोणत्या दराने? कोणत्या संस्थेकडून घेतल्या, या संस्थेचे ठेकेदार कोण? याची संपुर्ण माहिती द्यावी.  या खरेदीत भाजप पदाधिका-यांनी घोटाळा करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.

महापालिकेने 125 ग्रॅम वजनाच्या लाईफ बॉय साबणाची खरेदी केली आहे. या खरेदी पोटी 32 लाख 27 हजार 200 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. प्रत्यक्षात अनेक लोकांना साबण  मिळालेले नाही.    पालिकेने नेमके किती साबण खरेदी केले, याचा उल्लेख केला नाही.

साधा हिशोब केला तर साधारणपणे 125 रुपयांना एक साबण खरेदी केल्याचे दिसून येते. बाजारात पंचवीस ते तीस रुपयांना मिळणारी वस्तू महापालिकेने तब्बल 125 रुपयांना का, खरेदी केली. कोरोनाच्या संपुर्ण खरेदीत मोठी अनियमितता झाली आहे, साने यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विविध प्रकारची खरेदी थेट करण्याची मुभा दिली आहे. आपत्तीच्या कालावधीत अडचणीत असलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा प्रकारची सोय कायद्यात केलेली आहे. परंतु, आपत्तीचाही भाजपने गैरफायदा घेतला आहे.

त्यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची सखोल चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी आणि ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे.  तसेच या खरेदी-विक्रीत भाजपाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग  असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साने यांनी भाजपचा जाहीर निषेध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.