Pimpri : चित्रपटातील नायिकांचे विविध रुपातील सौंदर्य अविष्कार फुलवणारा सुजित सुरवसे

एमपीसी न्यूज- दगडाचा अनावश्यक भाग छिन्नी, हातोड्याने काढल्यानंतर त्याची सुंदर, मोहक आकर्षक मूर्ती तयार होते. बनवणा-याला मूर्तिकार म्हणतात. चित्रपटातील नायिकांचे विविध रुपातील सौंदर्य अविष्कार फुलवण्यासाठी मेकअपची गरज असते. त्याला रंगभूषाकार असे म्हणतात. पुणे तिथे काय उणे, रंग वेगळे गंध वेगळे तरी नभातील सर्व फुले. या काव्यमयपंक्ती प्रमाणे चित्रपटातील नायिकांचे सौंदर्य फुलवणारा सुजित सुरवसे होय…!

मी कशाला आरशात पाहू ग..मी कशाला बंधनात राहू गं..मीच माझ्या रूपाची राणी ग..” 1977 साली आलेल्या “बन्या बापू” या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आज ही तेवढच सालस आणि सोज्वळ भासते. यातील नायिकेला जरी आरशात पहायची गरज वाटत नसली. तरी, आजकालच्या नायिकांना आरशात पाहिल्याशिवाय आणि मेकअप केल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे त्या सुंदर नसतात असं मी अजिबात म्हणणार नाही पण कॅमे-याची मागणी म्हणून नायिकांना रंगरंगोटी करावीच लागते. आणि मेकअप करायला सुजित सुरवसे असेल. तर, नायक आणि नायिका अधिकच खुलून जातात.

पुण्यातील मांजरी या छोट्याशा गावातला 25 वर्षाचा हा नवतरुण, शिक्षण अत्यंत अल्प. आई-वडील मिळेल तो कामधंदा करुन आपली उपजिविका निभावत होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. सुजित सांगतो, “आई-वडिलांनी मोलमजुरी करुन आम्हा चार भावंडांना सांभाळले. इयत्ता पाचवी मध्येच असतानाच शाळा शिकत काम करायची आवड निर्माण झाली. परिस्थीती हलाखीची होती. म्हणुन सातवीमध्येच शाळा सोडली. तेव्हा मोठ्या भावाने शाळेत जात नाही म्हणून मारले . त्या रागात 2009 ला घर सोडले”

“रेल्वेने नवी मुंबईतील वाशी गाठली. हॉटेलमध्ये काम केले. हॉटेलमधील मित्र राहुल वेटरचे काम करत फिल्म लाईन मध्ये जुनियर आर्टिस्ट कलाकार म्हणून काम करायचा. त्याच्या मदतीने ‘स्पॉटबॉय’ म्हणून काम केले. त्यात काम करणार्‍या कलाकारांना चहापाणी, जेवण, देण्याचे काम केले. ‘स्पॉटबॉय’चे काम करताना मेकअप असिस्टंटला मदत करु लागलो. अनेक लोकांसोबत ओळख झाली. घर सोडताना कष्ट करायची जिद्द बाळगुनच मुंबई गाठली. काम करत गेलो आणि नवनवीन गोष्टी शिकत राहिलो” आज एक ‘फिल्म मेकअप अर्टिस्ट’ म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावारूपास आलो असल्याचे सुजित सुरवसे यांनी सांगितले.

आजपर्यंत हिंदी, मराठी, साऊथ, भोजपुरी, मैथिली, गढवाली असे असंख्य सुपरहिट सिनेमे ” कॉलेज डायरी, ” धुमस, फुर्रर्र ,बाबो, कृतांत, लग्नमुबारक , लवआॅल, पिरु, फुलस्टाॅप, जिंदगी, विराट सारखे अनेक चित्रपट तसेच मराठी हिंदी चित्रपट, मालिका, लघुपटमध्ये मेकअप अर्टिस्ट’ म्हणून सुजित सुरवसे याने काम केले आहे. आपल्या समोर येणारे अनेक सुंदर चेहरे आपल्याला कायम लक्षात राहतात. पण, त्यामागे प्रचंड मेहनत असते ती रंगभूषेच्या कलेची. पडद्यामागे दिसणार्‍या दर्शनिकदृष्या अविश्वसनीय कायापालट करण्याच्या या कला पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान,विद्या परदेशी जाऊन शिकण्याचा मानस असल्याचे सुजित याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.