Pimpri: पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ‘योग’ विषय अनिवार्य करा- गजानन बाबर

Pimpri: Make 'Yoga' compulsory in the curriculum from 1st to 10th- Gajanan Babar नियमित योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढण्यास तसेच मानसिक शांतता व तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विध्यार्थ्यांना योग आणि त्यासंबंधित गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणे गरजेचे झाले आहे.

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच योग आणि त्यासंबंधित गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग हा विषय अनिवार्य करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गजानन बाबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवाची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत नागरिक वेगवेगळ्या रोगांना बळी पडत आहेत.

कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जग चिंताजनक परिस्थितीचा सामना करत आहे. या विषाणूचा बहुतांश परिणाम कमी रोग प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांवर होत असून हे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.

नियमित योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढण्यास तसेच मानसिक शांतता व तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विध्यार्थ्यांना योग आणि त्यासंबंधित गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणे गरजेचे झाले आहे.

योग ही जीवनशैली आहे. योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. भारतात उगम पावलेली योग विज्ञान आता विश्वाच्या कानाकोप-यात सर्वदूर पसरली आहे.

राज्य शासनाने यासंबंधी निर्णय घेऊन पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग हा विषय अनिवार्य करावा अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.