_MPC_DIR_MPU_III

Pimpri: महापालिका कामगारांना कोणी वाली आहे की नाही?

(गणेश यादव)

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांवर हल्ले, मारहाण होण्याचे प्रकार वाढले आहेत. असे असताना कामगारांच्या पाठिशी कोणाही खंबीरपणे उभे राहताना दिसून येत नाही. कामगार संघटना तडजोडीची भूमिका घेत असल्याने आमच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागण्याची वेळ आल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचा-यांना कोणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेतील कर्मचा-यांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यांना नगरसेवकांकडून मारहाण केल्याच्या घटना घडत आहेत. कर्मचा-यांच्या पाठीशी कोणीही ठामपणे उभे राहताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचा-यांचे मनोधर्यै खचले जात आहे. एखाद्या कर्मचा-याला मारहाण झाल्यास कर्मचा-यांची एकजूट होत नाही. कामगार संघटना देखील त्यांच्या पाठिशी उभे राहत नाहीत. त्यांच्याकडून तडजोड करण्यावर भर दिला जात आहे. तडजोड होत असल्याने नगरसेवकांडून कर्मचा-यांवर होणारे हल्ल्याचे प्रमाण वाढतच चालले आहेत. बचाव होत असल्यामुळेच कर्मचा-यांवर हात उगारण्याचे धाडस नगरसेवक करत आहेत.

महापालिकेतील कर्मचा-यांवरील अन्याय, कामावर त्यांना येणा-या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत अधिकृत कर्मचा-यांची महासंघटना आहे. नगरसेवकांकडून उपभियंत्याना, कर्मचा-यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. परंतु, कर्मचा-यांच्या पाठीशी ठामपणे कोणतीही संघटना उभी राहिली नाही. त्यामुळे नगरसेवकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. बचाव होत असल्यामुळेच कर्मचा-यांवर हात उगरण्याचे धाडस नगरसेवक करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी 24 मे 2018 रोजी ‘अ’ प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे यांना काळे फासले होते. पोलिसात तक्रार करु नये यासाठी लवटे यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला. त्यानंतर पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपअभियंत्यांनी आंदोलन केले. परंतु, पुढे काहीच झाले नाही. भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी गुरुवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे औषध फवारणी करणारे कर्मचारी गणेश जगताप यांच्या कानशिलात लगाविली. याप्रकरणी देखील केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, महासंघाच्या लोकांशी बोलणे झाले असून प्रकरण मिटल्याचे केंदळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात देखील अनेक नगरसेवकांनी कर्मचा-यांवर हात उगारला आहे. परंतु, कामगार संघटना कचखाऊ भूमिका घेत असल्याने नगरसेवकांवर कोणतीही कारवाई होत नाही. कामगार संघटनांनी कर्मचा-यांच्या बाजून उभे राहणे अपेक्षित असताना तडजोडीची भूमिका घेतल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. नगरसेवक हे लोकप्रतिनिधी असून कामे मार्गी लावण्यासाठी त्यांच्यावर जनतेचा दबाव असतो. नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यात तीळमात्र शंका नाही. पण त्या समस्या निकालात काढण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांना मारहाण करणे, धमकावणे ही पद्धत योग्य नाही.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन नगरसेवक उत्तम हिरवे यांनी एका कर्मचा-यास सिमेंटचा गट्टू फेकून मारला होता. त्यावेळी कामगार संघटनांनी त्याच्याविरोधात जोरदार आवाज उठविला होता. संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी हिरवे यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्यांना निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविण्यात आले होते.

मारहाण केल्यास नगरसेवकाचे या कायद्यानुसार पद होईल रद्द

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 482 नुसार महापालिका कर्मचारी हे लोकसेवक आहेत. लोकसेवकास अपशब्द वापरणे, धमकी देणे, मारहाण करणे हे भारतीय दंड विधान कलम 353 नुसार फौजदारी गुन्हा आहे. तसेच, कलम 13 नुसार सभागृहातील एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्यांच्या शिफारसीने संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. पालिकेचा नगरसेवक म्हणून कर्तव्य बजावत असताना कोणत्याही गैरवर्तणुकीबद्दल किंवा कोणत्याही अशोभनीय वर्तणुकीबद्दल दोषी ठरल्यास राज्य सरकार स्वत:हून किंवा महापालिकेच्या शिफारशीवरुन त्या नगरसेवकास पदावरुन दूर करु शकते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.