Pimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ” शासनाने सर्वसामान्य नागरिक आणि मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. टपरी धारकांना, लहान मोठ्या व्यावसायिकांना आज (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चा निमित्त बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन पाळत सर्व स्तरातील व्यावसायिक आणि टपरी चालकांनी आज बंद पाळला आहे” सर्वांनी शांततेत आंदोलन करावं, असे आवाहन देखील त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संतोष वाघेरे, शैलेश वाघेरे, स्वप्नील वाघेरे, रामदास मोरे, दत्तात्रय जगताप यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या तरूणांनी बलीदान दिले, त्या तरूणांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. सरकारला आरक्षण देण्यासाठी एवढा वेळ का लागतो; हे समजण्यापलिकडे आहे. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.”

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, फडणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. महाराष्ट्रातील तमाम जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली. भाजपला सत्ता मिळून चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने 2013 लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आता देवेंद्र फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आमदार राजीनामा देण्याचे धाडस करीत असताना, बिल्डरांच्या भल्यासाठी, बैलगाडा शर्यतीसाठी राजीनामा देऊ म्हणणारे पिंपरी चिंचवडमधील खासदार, आमदार याविषयावर मात्र मुग गिळून गप्प बसले आहे ही शोकांतिका आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.