Pimpri : मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही

एमपीसी न्यूज – विभिन्न राजकीय पक्ष विचारसरणीचे असल्या कारणाने मराठा क्रांती मोर्चा पाठिंब्याच्या राजकारणापासून अलिप्त आहे. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे बॅनर कोणत्याही राजकीय पक्षात वापरू नये. असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ आहे. ती राजकारणाचा अड्डा किंवा राजकारण करण्याचे ठिकाण नव्हे. मराठा क्रांती मोर्चा मध्ये सर्वसामान्य मराठा तसेच जे कोणत्याही पक्षामध्ये नाहीत असे तरुण व जे सर्वच पक्षामध्ये विखुरले गेलेले तरुण एकाच ध्येयासाठी एकत्र आलेले आहेत.

येथे फक्त मराठा समाजाची उन्नती, उत्कर्ष ,मराठा आरक्षण व प्रलंबित सामाजिक मागण्या हेच उद्दिष्ट आहे. त्यामुळे ३५० वर्षानंतर एकत्र आलेला मराठा समाजामध्ये फूट पडू नये व तो पुन्हा विखुरला जाऊ नये यासाठी मराठा क्रांती मोर्चात कार्यरत असणारे अनेक समाज बांधव कार्यकर्ते विभिन्न राजकीय पक्ष विचारसरणीचे असल्याकारणाने मराठा क्रांती मोर्चा पाठिंब्याच्या राजकारणापासून अलिप्त आहे. कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा किंवा नाही असा कोणताही निर्णय मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने घेण्यात आलेला नाही. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या कोणत्याही सदस्याला व्यक्तिगतरीत्या राजकीय पक्षाचे काम करण्यास मोकळीक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

याबाबत आयोजित बैठकीस उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जीवन बोराडे, प्रवीण पाटील, प्रतीक इंगळे, सतीश काळे, सागर तापकीर, धनाजी येळकर, अभिषेक म्हसे, दत्ता शिंदे, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.