Pimpri: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. त्याद्वारे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आज आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रीया आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारचा कृती अहवाल मांडला आहे. तसेच, याबाबतचे विधेयक पटलावर ठेवले आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले.

कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. यानुसार दुपारी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे. या अहवालातून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळेल, हे स्पष्ट झाले आहे. तसेच, या विधेयकात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.