Pimpri : मराठी भाषा गौरव दिवस विविध उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरात मराठी भाषा गौरव दिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्यिक कवी, कथाकार बबन पोतदार आणि ज्येष्ठ कवयित्री जयश्री घुले तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा.मयूर माळी, प्रा.वाघ, प्रा.कांबळे उपस्थित होते. यावेळी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भीत्तीपत्रीकेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन, मराठी ही आपली मातृभाषा असल्याने, तिचे संवर्धन करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा काल- आज आणि उद्या कशी असेल यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सुदेश भालेराव, प्रज्ञा शिंदे, चंद्रकांत सोनवणे, मोहिनी खवळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर, डॉ. अतुल चौरे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र जाधव याने केले. प्रास्ताविक डॉ. अतुल चौरे यांनी केले. आभार प्रियदर्शनी पारकर यांनी मानले.

पिंपरीतील संत तुकाराम मंदिर येथे महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार परिषदेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राज अहेरराव यांनी ” माझी मायमराठी थोर, तिचे सौभाग्य ज्ञानेश्वर ” ही मराठीचे गुणगान करणारी कविता सादर करुन मराठीचा उगम ते आजच्या अपभ्रंशापर्यंतचा इतिहास सांगितला. अध्यक्षीय भाषणातून तुकाराम पाटील यांनी मातृभाषेतच ज्ञानाचा भंडारा दडला आहे म्हणून हिचा सन्मान केला तर ही आध्यत्मिक शांती देणारी भाषा आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी “माझ्या मराठी भाषेचा ताल आगळा वेगळा, ज्ञानदेव तुकोबांचा तिच्या भाळी आहे टिळा” ही गझल सादर केली. यावेळी अनिल पालकर, वासुदेव वेदपाठक, दिपेश सुराणा यांनी मनोगत व्यक्त केले. माधुरी विधाटे, कविता जावळे, वंदना माकडे, नंदू अप्पा कदम,राजु अरणकल्ले, प्रा.अनुजा गडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भारती चव्हाण, स्वानंद वेदपाठक यांनी केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जागतिक मराठी भाषा दिन’ विविध उपक्रमासह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव व पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख अपर्णा टेकवडे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘हीच एक प्रार्थना’ हे गीत ‘एक सूर एक ताल’ या संकल्पनेतून सादर केले. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणूनच आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी बाणा आणि मराठीची धन्यता दाखवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य’या गीतावर नृत्य सादर करण्यात आले.यानंतर मराठी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची ‘ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. सूत्रसंचालन शीतल जाधव यांनी केले तर संयोजन रेखा नंदगवळी, प्रतिज्ञा घोटकुले, ज्योती जगदाळे यांनी केले.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात ‘मराठी राजभाषा दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मधू दाणी, आशा घोरपडे, स्वाती तोडकर, बिसमिल्ला मुल्ला, श्रद्धा देशमुख, नीलिमा नायडू आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन मुख्याध्यापिका गीता येरूणकर व हर्षा बाठिया यांच्या हस्ते झाले. त्यांनी मराठी भाषेची महती विशद केली. मराठी भाषेचा इतिहास स्नेहा बोरले यांनी मांडला. वि.वा.शिरवाडकरा यांच्याविषयी माहिती साक्षी शिर्के यांनी दिली. तर मराठी भाषेचे महत्त्व गौरी सत्वधर, निलम मेमाणे, स्वाती गाडे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टीक बंदी’ हे पर्यावरणावर आधारीत जनजागृतीपर नाटक सादर केले. तसेच विद्यार्थ्यींनींनी ‘मंगळागौर’ द्वारे मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले. याबरोबरच म्हणींवर आधारीत प्रश्नमंजूषाही घेण्यात आली. पाचवीतील श्रेया खाडे हिने लघुनाटीका सादर केली. तसेच आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी रंगासाथीया हे नाटक सादर केले. यामध्ये सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. सूत्रसंचालन आदित्य पवार, सृष्टी आणि सावनी या विद्यार्थ्यांने, तर आभार प्रणाली पाटील यांनी मानले.

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश, प्रसिध्द साहित्यकार बी.एस.कांबळे, मनीष गोयल (बांधकाम व्यावसायिक), उमेश टाक (बांधकाम व्यावसायिक) उपस्थित होते.

बी.एस. कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस आणि त्याची मातृभाषा मराठी. परंतु त्याची बोली त्यांच्या जन्मस्थान अथवा कर्मस्थानावरून ठरत असते. पिंपरी चिंचवडचा अभ्यास केल्यास वेगवेगळ्या भागांची अनुभूती येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामधंदा, नोकरीनिमित्त आलेला माणूस येथे वास्तव्यास आहे. त्यांच्याशी बोलताना त्या त्या भागातील बोली ऐकायाला मिळते. त्यातील लय लकब दिसते व्यक्तीच्या बोलण्यावरुन तो कोणत्या भागातील आहे याची माहिती न विचारताही ऐकणाऱ्या व्यक्तीला होत असते. इतका प्रभाव बोलीचा दिसून येतो.”

यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी कविता, मराठी गीत सादर केले. मराठी गौरवा निमित्ताने हस्ताक्षर स्पर्धा (3 री ते 5 वी), निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा (6 वी ते 9 वी) घेण्यात आली. आणि विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मराठी पुस्तके वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन प्रियंका लाडे यांनी तर हेमा शेलार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.