Pimpri : देवीचा साहित्यिक जागर

एमपीसी न्यूज- शब्दधन काव्यमंचाने ‘देवीचा जागर आणि साहित्यिक गप्पा’ अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते संगीता झिंझुरके यांनी गायलेल्या रसाळ भक्तिगीताने रस्टन कॉलनी, निगडी-प्राधिकरण येथे चैतन्य निर्माण केले. नवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून मैफिलीचा प्रारंभ मधुश्री ओव्हाळ यांनी सादर केलेल्या पारंपरिक भोंडलागीताने झाला.

राज अहेरराव अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे नंदकुमार कांबळे यांच्यासह बाबू डिसोजा, नंदकुमार मुरडे, रजनी अहेरराव, उज्ज्वला केळकर, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक -अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची उपस्थिती होती.

त्यानंतर झालेल्या मनोगतांतून प्रा. तुकाराम पाटील, कैलास भैरट, राजेंद्र घावटे यांनी स्त्रीशक्तीची महती विशद केली. सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुणे नंदकुमार कांबळे यांनी ‘माँ शेरावाली’ हे चित्रपटगीत प्रभावीपणे सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली; तसेच “घरात आणि समाजात स्त्रीचा सन्मान केला पाहिजे!” असे मत त्यांनी व्यक्त केले. राज अहेरराव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “संतसाहित्य आणि पारंपरिक काव्य हे समाज प्रबोधन करते त्याचबरोबर माणूस आणि परमेश्वर यांच्यात अद्वैत निर्माण करते ” असे विचार मांडले.

माधुरी डिसोजा, अशोक कोठारी यांची प्रार्थना उपस्थितांना भावली; तर शोभा जोशी यांनी म्हटलेल्या जोगव्याला सर्वांनी सामूहिक गायनसाथ केली.शरद काणेकर, अनिकेत गुहे, अंजली अहेरराव यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मधुश्री ओव्हाळ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.