Pimpri : ‘एसआरए’अंतर्गत झोपडीधारकांना 500 चौरस फुटांची घरे देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत शहरातील झोपडीधारकांना 500 चौरस फुटांची घरे देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत घोषित झोपडपट्या 37 आहेत. त्यातील झोपड्यांची संख्या 18 हजार 900 असून एकूण क्षेत्रफळ 544381.69 इतके आहे. या झोपड्यामधील लोकसंख्या 80 हजार 282 इतके आहे. तर, अघोषित झोपडपट्या एकूण 34 असून त्यातील झोपड्यांची संख्या 16 हजार 361 इतकी आहे. क्षेत्रफळ 547746.84 इतके आहे. या झोपड्यामधील लोकसंख्या 66 हजार 948 इतकी आहे. अशा एकूण घोषित, अघोषित झोपडपट्टया 71 आहेत. झोपड्यांची संख्या 35 हजार 261 इतकी आहे. एकूण क्षेत्रफळ 1092128.53 इतकी आहे. या झोपड्यामधील लोकसंख्या 147810 इतकी आहे.

यातील सरकारी जागेवरील झोपडपट्टयांची संख्या 16 , एमआयडीसीच्या जागेवरील झोपडपट्टयांची संख्या 16, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्टयांची संख्या 8, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टयांची संख्या 6 आणि खासगी जागेवरील झोपडपट्टयांची संख्या 25 आहे. अशा एकूण शहरात घोषित, अघोषित 71 झोपडपट्टया आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत प्रती झोपडीधारकांना कारपेट 269 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्यात येणार आहे. झोपडपट्टीवासी यांच्या कुटुंबांतील एकूण संख्या पाहता ती खूप अपुरी असून ती कायमस्वरुपी गैरसोयीची ठरणार आहे. एकूण या सर्व जागांचे लोकेशन पाहता संबंधित विकसक यातून करोडो रुपये कमवणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारची मान्यता घेऊन कायद्यात योग्य ते बदल करुन एसआरए योजनेअंतर्गत प्रती झोपडी कारपेट 269 चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिकेऐवजी प्रती झोपडी कारपेट 500 चौरस फुट सदनिका असावी. असा निर्णय करुनच पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एस.आर.ए.) अंतर्गत पुनर्वसन योजना राबवावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.