Pimpri: पेट्रोल, डिजेल दरवाढ करुन गोरगरिबांचा खिसा कापणाऱ्या भाजपचा निषेध

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला निषेध

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाठ वाढविले आहेत. कच्या तेलाचे भाव कमी असतानाही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. भाजप सरकार पेट्रोल, डिझेल दरवाढ करुन सर्वसामान्य जनतेचा खिसा कापत असून गोरगरिबांची लूट केली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी भाजप सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित करून, अच्छे दिनचे वादे करून, ‘बहुत हुई महंगाई कि मार, आपकी बार भाजप सरकार!’ अशा लोभस घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी नाना प्रकारच्या आश्वासनांची बरसात केली. त्याला जनतेने भुलून सत्तेसाठीचे धो धो बहुमत भाजपला दिले. मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या काळात ‘त्या बाता एकेक करीत थापा’ असल्याच उघडकीस येत आहे.

केंद्रात मोदी सरकार व राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेकलेने पेट्रोल व डिझेल दरवाढ वाढवली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. ऑक्टोबर 2017 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाची किमंत प्रतीबॅरल 55 डॉलर अशी असताना दिल्लीमध्ये 71 रुपये कोलकत्यामध्ये 73 रुपये आणि मुंबई, पुणे मध्ये 80 रुपये असा पेट्रोलचा एक लिटरचा भाव होता. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्या तेलाची वारंवार कमी झालेले दर पहाता आज पेट्रोल 40 रुपये लिटरने ग्राहकांना मिळायला हवे.

2018 च्या सुरुवातीपासून सातत्याने इंधनाची रोजच 10 ते 20 पैशांनी वाढ होत आहे. डिझेलने सोमवारी दरवाढीचा उच्चांक केला आहे. मुंबईत डिझेल 73.64 रुपये प्रती लिटर गेले आहे. तर, पेट्रोल 85.33 झाले आहे. तर, पुण्यात डिझेल 72.64 रु प्रती लिटर असून पेट्रोल 85.33 एवढे दर झालेले आहेत. मागील चार वर्षांत पेट्रोल, डिझेल दरवाढीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या पोस्टरबाजीत गुंतले आहे. पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो असलेले भलेमोठे पोस्टर्स देशातील सर्व पेट्रोल पंपांवर लावा नाहीतर इंधनपुरवठा रोखू अशी जबरदस्ती पेट्रोल पंप मालकांना सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई व बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना केंद्र व राज्य सरकारने पुन्हा पेट्रोल व डिझेल दरवाढ केलेली आहे. असे असताना अंध मोदी भक्त निर्लज्जपणे समर्थन करताना दिसतात यांना जनाची नाही मनाची लाज देखील वाटत नाही. पेट्रोल, डिझेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लूट असून या लुटीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असे भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.