Pimpri : करवाढ, पाणीपट्टीवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – आर्थिक मंदी, बंद पडणारे कारखाने, त्यामुळे जाणारा रोजगार, प्रचंड महागाईमुळे औद्योगिकनगरीचे कामगार, सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. तो त्रस्त आहे. अशात जिझिया मिळकतकर व पाणीपट्टीवाढ ही नागरीकांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे तात्काळ करवाढ आणि पाणीपट्टीवाढ मागे घेण्यात यावी. अन्यथा शहरातील कामगार व नागरिकांना एकत्रित करून आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने जिझिया मिळकतकर आणि पाणीपट्टी, करवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला होता. त्यावर 20 फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, भाजपने महासभा तहकूब केली. त्यामुळे करवाढ, पाणीपट्टीवाढ लादली आहे. त्यानुसार 2007 पूर्वीच्या मालमत्तांना दुपटीने आणि तिपटीने करवाढ होणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून वाढीव दराने मालमत्ता करांची आकारणी करण्यात येईल. ही वाढ अत्यंत चुकीची आहे. एकाचवेळी एवढी मोठी करवाढ केली जाणार आहे.

पाणीपट्टीच्या दरात देखील मोठी वाढ केली आहे. पाणीपट्टीवाढ देखील मागे घेण्यात यावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. महापालिकेतील सुरू असणारी अनागोंदी व भ्रष्ट कारभार बंद केला. तर, ही करवाढ करण्याची मुळीच आवश्यकता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.