Pimpri : पालिकेच्या प्रवेशव्दारावर शिवमुद्रा लावावी – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशव्दारावर शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गार वाक्य कायमस्वरुपी लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, सन 2007 ते 2012 या कालावधीत आपण नगरसेवक असताना महापालिका प्रवेशव्दार, महापालिका सभागृह व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची कोनशिला लावण्याची मागणी तत्कालीन महापौरांकडे केली होती. त्यानुसार या तिन्ही ठिकाणी कोनशिला प्रशासनाने लावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेसाठी केलेले क्रांतीकारी कार्य सर्वांना ज्ञात आहे. शिवरायांनी तलवारीच्या शक्तीने हे राज्य निर्माण करुन रयतेचे कल्याण केले. तर, भीमरायांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर लेखणीच्या सहाय्याने स्वातंत्र, समता, बंधुत्व व न्याय या गोष्टीचा समावेश करुन सर्व समावेशक, सर्वांना समान न्याय देणारे जगातील सर्वत्तम संविधान संपूर्ण देशाला बहाल केले आहे.

महापालिका प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला भव्यदिव्य संविधान प्रस्तावना लावली आहे. त्याच धर्तीवर या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गगार वाक्य कायमस्वरुपी लावावेत. अशी मागणी 2012 मध्ये तत्कालीन महापौरांकडे केली होती. त्यावर महापौरांनी पुढील उचित कार्यवाहीसाठी आयुक्त यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर आम्ही वेळोवेळी ही मागणी केली आहे.
छत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ अशी घोषणा देत भाजपा महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवप्रेमींची मते घेऊन सत्तेवर आली. महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आमदारांनी भाजपाच्या सर्व विजयी नगरसेवकांना किल्ले शिवनेरी येथे नेऊन शिवप्रभुंची शपथ दिली. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन महापालिका प्रवेशव्दारावर शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गार वाक्य कायमस्वरुपी लावण्यात यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.