Pimpri: मारुती भापकर यांचा शिवसेनेला रामराम

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला राजीनामा

एमपीसी न्यूज – शिवसेनेने भाजपसोबत युती केल्याने नाराज झालेले माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनाला रामराम ठोकला आहे. त्यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.

याबाबत उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने काळभोरनगरमधून मला उमेदवारीही दिली. त्यात मी प्रमाणिकपणे शिवसेनेच्या इतर तीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयन्त केले. मात्र, शिवसेना नेत्यांनी षडयंत्र रचून माझा निसटता पराभव घडवून आणला. असे असताना मागील दोन वर्षापासून महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या विरोधात कायम संघर्षाची भूमिका घेऊन मी लढत आहे.

  • शहरात वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असताना अनियमित बांधकामे शास्तीकर, शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी या विषयाबाबत आंदोलन करीत असताना हे भापकरांचे वैयक्तीक आंदोलन आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काडीचा संबंध नाही, असे म्हणून सेनेने अलिप्त राहणे पसंत केले.

कार्यकर्ते शेळ्या-मेंढ्या नव्हेत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणाबाबत देशभर असंतोष आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, महागाईमुळे सामान्य माणूस मेठाकुठीला आला आहे. त्यामुळे केंद्रातील हे जुलमी सरकार पदच्युद व्हावे, अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे. मात्र, ऐकमेकाविरुध्द येवढ्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या असताना पुन्हा गळ्यात गळा घालणे. हे सरळ-सरळ जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे. कार्यकर्ते शेळ्या-मेंढ्या नसून त्यांनाही ईश्वरांने बुद्धी दिलेली आहे. त्यामुळेच मी शिवसेना या पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असे भापकर यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.