Pimpri : ‘ईझी मनी’साठी मास्कचा कृत्रिम तुटवडा?; ब्लॅक मार्केटिंग केल्यास कठोर कारवाईचा अन्न औषध प्रशासनाचा इशारा

एमपीसी न्यूज – अनेक किरकोळ आणि ठोक औषध विक्रेते, काही उत्पादक कंपन्यांकडून जाणीवपूर्वक मास्कचा कृत्रिम तुडवडा निर्माण करण्यात आला आहे. तसेच उपलब्ध मास्कचा पुरवठा दहा पटींनी चढ्या किमतीने विकला जात आहे. त्यामुळे संबंधित विक्रेते आणि उत्पादक ईझी मनीच्या मागे लागून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. दरम्यान, मास्कची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे.

एस. के. सर्जिकलचे ओमप्रकाश ओझा यांनी याबाबत माहिती दिली की, बाजारामध्ये सर्वसाधारणपणे सिंगल लेयर, डबल लेयर, ट्रिपल लेयर (एन 95) अशा तीन प्रकारचे मास्क मिळतात. सिंगल लेयर मास्क पूर्वी ठोक विक्रेत्यांना उत्पादक कंपनीकडून एक रुपया ते 1.30 रुपयांपर्यंत मिळत होता. तो मास्क आता उत्पादक कंपन्या आणि सुपर डीलरकडून सुमारे नऊ रुपयांपर्यंत मिळत आहे. डबल लेयर मास्क सध्या उत्पादक कंपन्यांकडून 20-25 रुपयांना मिळत आहे. त्यात वाहतूक खर्च पकडून या मास्कची 25-30 रुपयांना विक्री केली जात आहे.

ट्रिपल लेयर (एन 95) मास्कची किंमत 80-120 रुपयांपर्यंत होती. उत्पादक कंपन्या आणि सुपर डीलरकडून 150 ते 250 रुपयांना त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे किरकोळ विक्री केंद्रात हे मास्क चढ्या किमतीने विकले जात आहेत. अनेक उत्पादक कंपन्या, सुपर डीलर, डीलर आणि किरकोळ विक्रेते मास्क संपल्याचे सांगत आहेत.

काही जणांनी जाणीवपूर्वक मास्कचा मोठा साठा दाबून ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्पादक कंपन्या आणि संबंधित विक्रेते करोना विषाणू सर्वत्र पसरण्याची वाट बघत आहेत. एकदा का विषाणूचा फैलाव झाला की संबंधित विक्रेते आपला साठा बाहेर काढून मोठ्या किमतीला त्याची विक्री करतील. त्यामुळे विक्रेत्यांना ईझी मनीचे वेध लागले आहेत.

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतात देखील करोना व्हायरस हळूहळू आपले पाय रोवत आहे. भारतात 23 जणांना नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. औषध आणि लस निर्मितीचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरु आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट संशोधन आणि विकास विभागाने देखील यावर काम सुरु केले आहे.

करोनापासून दक्षता घेण्यासाठी पुणे आणि पिंपरी महापालिका तसेच प्रशासनाच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. करोना विषाणूच्या दक्षेतसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, विक्रेत्यांच्या कृत्रिम साठ्यावर राज्याच्या विधानसभेत देखील पडसाद उमटत आहेत. अनेक लोकप्रतिनिधी याबाबत सरकारला कारवाई करण्यासाठी जाब विचारत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मास्कची उपलब्धता मोठ्या प्रमाण करून द्यावी. त्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कारवाई, अशी मागणी केली. तर नितेश राणे यांनी एन 95 मास्कचा बाजारात तुटवडा असल्याचे विधानसभेत सांगितले.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कची उपलब्धता वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे. एकंदरीत राजकीय पातळीवर करोनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून मास्कचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

औषध प्रशासन विभागाचे पुणे सह आयुक्त सुरेश पाटील म्हणाले, “करोना विषाणूच्या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. औषध प्रशासनाने जिल्ह्यातील डीलर आणि डिस्ट्रिब्युटरची बैठक घेतली आहे. त्या बैठकीत सर्वांना ब्लॅक मार्केटिंग न करण्याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. मास्क किंवा तत्सम वस्तू चढ्या किमतीला विक्री करताना कोणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.”

‘करोना’ची लक्षणे –
दीर्घ काळ राहणारा खोकला, वारंवार सर्दी होणे, वारंवार ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंग आणि डोकेदुखी, घसा दुखणे, मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे

  • काय काळजी घ्यावी :-
    साबण व पाणी वापरून धुवा (20 सेकंदापर्यंत)
    सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा
    शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर, तोंडावर रुमाल धरावे
    गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये
    आजारी व्यक्तीच्या अधिक संपर्कात जाऊ नये
    इतरांच्या टॉवेल, मोबाईल, हेडफोन यांसारख्या वस्तू वापरू नये
    डोळे, कान व नाकाला हाताने वारंवार स्पर्श करू नका
    सार्वजनिक वापराच्या वस्तू नियमित स्वच्छ कराव्यात
    आजाराची लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा
    मास्क किंवा रुमालाचा वापर करावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.