Pimpri: पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक

एमपीसी न्यूज – मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (एमएमआर) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (पीएमआर) सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रवेश ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिंन्हा यांनी काढले आहे.

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना विषाणुचा (COVID-१९) प्रसार होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्यासंबंधीच्या विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

सद्य:स्थितीत मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (MMR.) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासकीय कार्यालयामध्ये हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ही सूचना केली आहे. मास्क न घालणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नसून पुढील आदेश येईपर्यंत ही सूचना लागू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.