Pimpri : लॉकडाऊनच्या काळात मातृभूमी प्रतिष्ठानकडून गरजू कुटुंबांना मायेचा घास

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात सर्व कामे, व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मातृभूमी प्रतिष्ठानने अन्नछत्र सेवा सुरू केली आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, सांगवी, गुरव पिपळे या भागात ही सेवा सुरू आहे.

अन्नछत्र सेवेमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल दौडकर, अनिकेत कडदेकर, विवेक कन्नलू, जयदीप साने, चेतन मेस्ता, अमित दौडकर, यशवंत गंभीरे, गजानन धावडे आदी सदस्य स्वतः गरजू लोकांपर्यंत पोहोचून आवश्यक अन्न व किट पुरवत आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून संचारबंदी, जमावबंदीचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सर्व कारखाने, कंपन्या, उद्योग, बांधकाम साईट बंद झाल्या. अचानक रोजगार बंद झाले. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, हलाखीची परिस्थिती आहे अशा कुटुंबांचे हाल होऊ लागले. पण शासन आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गरजू नागरिकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून रसद पुरविण्यास सुरुवात केली. पिंपरी चिंचवड मध्ये देखील मातृभूमी प्रतिष्ठान असाच एक उपक्रम राबवित आहे.

मातृभूमी प्रतिष्ठान परिसरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी, सांगवी, गुरव पिपळे या भागात अन्नछत्र सेवा देत आहे. दररोज सुमारे 700 लोकांची भूक भागवली जात आहे. तसेच ज्या कुटुंबांना अन्नधान्याची गरज आहे, अशा कुटुंबांना किट उपलब्ध करून दिले जातात. सॅनिटायझर आणि मास्क देखील प्रतिष्ठानच्या वतीने वितरित करण्यात आले आहेत. अन्नछत्र सेवेमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान बरोबर परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली आहे. त्यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू असून लॉकडाऊन समाप्त होईपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.