Pimpri : मावळ,शिरुरचा खासदार राष्ट्रवादीचाच होणार – विलास लांडे 

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची होणार 'घरवापसी' 

एमपीसी न्यूज – सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनता ख-याला न्याय देणार असून बारामतीसह मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे, असा विश्वास भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही मतदार संघाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ठरविणार आहेत. साहेब, दादा जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य आहे.  राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने रविवारी (30) जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आज (शुक्रवारी)घेण्यात आलेल्या पिंपरीतील पत्रकार परिषदेत लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप  उपस्थित होते.

”भाजपने शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी भाजपने हे प्रश्व सोडविले नसल्याचा” आरोप करत विलास लांडे म्हणाले, ”भाजपच्या राजवटीत महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. संत पीठाच्या धार्मिक कामात देखील सत्ताधा-यांनी पैसै खालले आहेत. संतपीठाच्या कामात पैसे खाऊन भाजपने कळसच केला आहे. सत्ताधारी जनतेच्या हिताची नव्हे तर स्वहिताची कामे करण्यात दंग आहे. जिथे पैसे मिळतील. तिच कामे केली जात आहे. सत्ता तुमची आहे. पण पैसे करदात्या जनतेचे आहेत, याचे भान सत्ताधा-यांना राहिले नाही. सगळी विकास कामे वाढीव दराची आहेत. रिंग करुन निविदा भरल्या जात असून तेच-तेच ठेकेदार येत आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असून याची चौकशी केली जाईल”, असेही ते म्हणाले.

”भाजपने पिंपरी-चिंचवड शहराची सध्या पुरती वाट लावली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे सत्ताधारी भाजपचे बाहुले बनले आहेत. हर्डीकर कधी इकडे असतात तर कधी तिकडे असतात. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. शहराचे पुन्हा एकदा नंदनवन करण्यासाठी आणि शहर वाचविण्यासाठी  तुकाराम मुंढे यांच्या सारख्या खमक्या अधिका-याची आयुक्त म्हणून गरज आहे. मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केल्यास सत्ताधा-यांची पळता भुईथोडी होईल”, असेही लांडे म्हणाले.

प्रशांत शितोळे म्हणाले, ”जलसंपदा विभागाच्या निविदा कमी दराच्या असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात येवून सांगितले होते. मग पिंपरी-चिंचवड शहरातील जादा दराच्या निविदा मु्ख्यमंत्र्यांच्या लक्षात का येत नाहीत. महापालिकेतील प्रत्येक कामाची निविदा जादा दराची आहे. चिखलीतील संतपीठाच्या कामात भाजपने भ्रष्टाचार केला आहे. घाणेरड्या पद्धतीने आयुक्तांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे कुरण सुरु केले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.