Pimpri: नागरिकांच्या सहकार्यातून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखू – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कामकाजास्तव महापालिका कार्यालयात येऊ नये या महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना सारख्या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणु संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने विविध स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. महापालिका कार्यालयांमध्ये दैनंदिन आणि वैयक्तिक कामासाठी नागरिक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे समाजसेवक, ठेकेदार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांची वर्दळ असते. गर्दीची ठिकाणे टाळणे, हस्तांदोलन टाळणे आदी प्राथमिक सूचना महापालिकेने विविध माध्यमातून नागरिकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय खबरदारी म्हणून उद्याने, वाचनालये, शाळा आणि आस्थापना देखील महापालिकेने बंद केल्या आहेत.

महापालिकेशी संबंधित काही कामकाज असेल तर शक्यतो ऑनलाईन पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्यकतेनुसार नागरिकांना महापालिका कार्यालयात येणे आवश्यक असल्यास त्यासाठी काही प्रतिबंधात्मक स्वरुपाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून, यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.