Pimpri: शिक्षक-विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या डिजिटल प्रशिक्षण आणि संसाधन केंद्राचे महापौरांचे हस्ते उद्घाटन

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अल्फा लावलचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील शास्त्री नगरमधील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील अभिनव अशा डिजीटल प्रशिक्षण व संसाधन केंद्राचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (मंगळवारी) उद्घाटन करण्यात आले. पिंपरी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि अल्फा लावल कंपनीच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. वाय4डी फाउंडेशन या संस्थेतर्फे हे केंद्र चालविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि डिजिटल क्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. संगणक व डिजिटल माध्यमाविषयी उत्सुकता असणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी या केंद्रामध्ये अद्ययावत संगणक व सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी वाय4डी या स्वयंसेवी संस्थेकडे देण्यात आली असून या संस्थेकडे अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

या केंद्रामध्ये 24 संगणक, ब्रॉडबँड संपर्क यंत्रणा, अखंड वीजपुरवठा यंत्रणा, संवादी फळे, उच्च ध्वनी यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा, अग्नीशमन यंत्रणा, प्रथमोपचार अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्रांच्या पहिल्या वर्षातच सुमारे दिडशे शिक्षक व आठशे विद्यार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्यात येईल. अल्फा लावलचा महिला सबलीकरणावर भर राहिला आहे. त्यानुसार या केंद्रासाठी डिजिटल क्षेत्रातील एका अनुभवी व कुशल महिला प्रशिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली असून प्रशिक्षिका दोन वर्षे हे केंद्र चालविणार आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच आपल्या सामाजिक बांधिलकीतून अल्फा लावल कंपनीने उभा केलेले हे केंद्र हे महत्त्वाचे योगदान आहे. स्मार्ट शहर विकसित होत असताना नागरिकांना डिजिटल कौशल्ये येणे गरजेचे आहे. या कौशल्यातूनच त्यांना त्यांची स्वप्ने साकार करता येऊ शकतात. म्हणूनच नव्या पिढीमध्ये, लहान मुले व तरुणांमध्ये ही कौशल्ये विकसित करण्यासाठी अल्फा लावल कंपनीने महापालिकेला या उपक्रमाद्वारे जे सहकार्य दिले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो व कंपनीचे त्यासाठी अभिनंदन करतो.

आपले शहर स्मार्ट व सर्वसमावेश करण्यासाठी अल्फा लावल प्रमाणे इतरहीकंपन्यांनी पुढे यावे असे आम्ही आवाहन करतो. अशा उपक्रमांमधील भागीदारीचे पिंपरी चिंचवड महापालिका नेहमीच स्वागत करेल आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

अल्फा लावलच्या भारत, पश्चिम आशिया, आफ्रिका समुहाचे अध्यक्ष अल्फा लावल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंथ पद्मनाभन म्हणाले, पिंपरी महापालिकेच्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल साक्षरता व कौशल्ये विकसित व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अभिनव आहे. अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.

अल्फा लावलच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम चालविण्यात येत आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे शैक्षणिक स्थान तर त्यामुळे उंचावेल, शिवाय महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षणही मिळू शकेल, असा कंपनीला व महापालिकेला विश्वास वाटतो. वेगळा विचार करणे आणि तंत्रज्ञान व उपकरणे यांना हाताळणे यासंदर्भात या नव्या विद्यार्थ्यांकडे खुप क्षमता आहेत. त्यांच्या या क्षमतांना या केंद्रामुळे एक वेगळे व्यासपीठ व पाठबळ मिळेल.

गेल्या वर्षापासून अल्फा लावल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट फोन वापरण्यासंबंधी तसेच संगणक हाताळण्यासंबंधीचे एक प्राथमिक प्रशिक्षण देत आहे. महापालिकेच्या शंभरेक शाळांमधील शिक्षकांना संगणकासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव महापालिकेने कंपनीकडे मांडला होता. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार संगणक व स्मार्ट फोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अल्फा लावल कंपनीतील 25 कर्मचारी पुढे आले होते.

गेल्या 13 आठवड्यांमध्ये महापालिकेच्या विविध शाळांमधील सुमारे 130 शिक्षकांनी त्याअंतर्गत प्रशिक्षण घेतले. शिक्षकांशी बोलून त्यांच्या या संदर्भात नेमक्या काय गरजा आहे हे आधी जाणून घेण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचेही त्यासंदर्भात मत जाणून घेण्यात आले होते. त्यानंतर या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला. पैशाचा ऑनलाईन भरणा कसा करावा तसेच सोशल मिडियाचा वापर कसा करावा याचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

अल्फा लावलविषयी!
हीट ट्रान्स्फर, सेपरेशन आणि फ्लुइड हँडलिंग या क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित विविध उत्पादने तसेच अभियांत्रिकी सेवा पुरविणारा अल्फा लावल हा जगातील एक अग्रगण्य समुह आहे. आपल्या ग्राहक कंपन्यांच्या औद्योगिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने अल्फा लावलची विविध यांत्रिक उत्पादने, व्यवस्था-प्रक्रिया तसेच सेवा बनविलेल्या असतात. खाद्यान्न, ब्रुवरिज, रसायने आणि पेट्रोरसायने, औषधे स्टार्च, साखर आणि इथेनॉल तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये लागणाऱ्या उष्णता निर्मिती, शीतकरण, विलगीकरण आणि वहन यासारख्या प्रक्रियांमध्ये कंपनीची उत्पादने व सेवा वापरल्या जातात.

जहाजांवरील उर्जानिर्मिती, तेल व नैसर्गिक वायुंचा शोध, यंत्र अभियांत्रिकी उद्योग, खाण, सांडपाणी प्रक्रिया तसेच शीतकरण उत्पादने या उद्योगक्षेत्रांमध्येही कंपनीने बनविलेली उत्पादने वापरली जातात. जगभरातील सुमारे शंभर देशांमध्ये पसरलेल्या आपल्या अनेक ग्राहक कंपन्यांना जागतिक स्पर्धेत पुढे राहण्यात मदत करण्यासाठी अल्फा लावल समुह कार्यरत असतो. नॅस्डॅक ओएमएक्समध्ये नोंदणीकृत असलेल्या अल्फा लावलने 2018 मध्ये 40.7 अब्ज स्वीडीश क्रोनर (सुमारे 3.8 अब्ज युरो) इतक्या किमतीच्या उत्पादन व सेवांची विक्री केली. कंपनीमध्ये सुमारे 16,400 कर्मचारी आहेत.

अल्फा लावल कंपनी भारतात 1937 पासून कार्यरत आहे. www.alfalaval.in सेंट्रीफ्युगल सेप्रेटर्स, डिकॅन्टर्स आणि फ्लो इक्विपमेंटस् तयार करणारे कंपनी समुहाचे उत्पादन केंद्र म्हणून भारतातील या केंद्राचे विशेष महत्त्व आहे. समुहाच्या जगभरातील विविध विक्री कंपन्यांच्या माध्यमातून या उत्पादनांची विक्री केली जाते. भारतातील खाद्यप्रक्रिया, तेल व नैसर्गिक वायू, उर्जानिर्मिती, पोलाद व धातु, साखर, औषधनिर्मिती, कागद व लगदा निर्मिती, खाद्यतेले प्रक्रिया, डिस्टीलरी, ब्रुवरी, स्टार्च, इनऑर्गेनिक, मरिन आणि इफ्लुअंट हँडलिंग आदी विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने व प्रक्रिया यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.