Pimpri: ‘वायसीएमएच’मधील ‘स्वॅब टेस्टींग लॅब’चे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mayor inaugurates Swab Testing Lab at YCMH : दररोज 350 ते 400 स्वॅब टेस्टींग होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीकरीता पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीएफसीआर स्वॅब टेस्टींग लॅब सुरु करण्यात आली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. प्रविण सोनी, डॉ. सतिश पाटील, डॉ. मोकाशी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळाली होती. त्या माध्यमातून दररोज 350 ते 400 स्वॅब टेस्टींग होणार आहेत.

यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल, असे महापौर ढोरे म्हणाल्या.

त्याचप्रमाणे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अँटिजेन टेस्टिंग किट उपलब्ध झाले आहेत. याद्वारे कोरोनाची लक्षणे असणारे सुमारे एक लाख तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी होणार आहे.

अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे कि नाही याची माहिती मिळणार आहे.

तसेच कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या रुग्णांची रोजची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी पद्धतीत रुग्णाच्या घशातील किंवा नाकातील स्त्रावाचं परीक्षण केले जाणार आहे.

या अतिविशिष्ट किटद्वारे रुग्णांचे निदान 15 ते 30 मिनिटांत होऊन रुग्णाचा अहवाल मिळणार आहे. महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट मधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत.

उदा. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे-यकृत-मूत्रपिंडे अशा अवयवांचे दीर्घकालीन गंभीर आजार, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती, एचआयव्ही बाधित, कर्करोगाची केमोथेरपी घेणारे, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, दम लागणे अशी फ्लूसदृश लक्षणं आहेत, अशा व्यक्ती तसेच जे रुग्ण कोरोना विषाणूच्या आजाराने बाधित आहेत अशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची या किटद्वारे चाचणी करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.

अँटिजेन टेस्टिंग रुग्णांना वरदानच ठरणार आहे. जलद गतीने होणाऱ्या चाचण्यांमुळे अधिकाधिक रुग्णांचे निदान होईल.

बाधित रुग्णांची संख्या कदाचित सुरुवातीला जास्त असेल; पण आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण आणि ते मृत्युमुखी पडण्याची संख्या मर्यादित होईल.

कोरोना विषाणूची महासाथ नियंत्रणात येण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं पडेल, अशी आशा महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.