Pimpri : महापौर दबावाखाली काम करतात, राष्ट्रवादीचा आरोप

खासगी वाटाघाटीचा विषय तीन महिन्यांसाठी लांबणीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये खासगी वाटाघाटीच्या विषयांवरुन मोठी दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे सातत्याने हा प्रस्ताव तहकूब केला जात असून सोमवारी झालेल्या महासभेत खासगी वाटाघाटीचा विषय तीन महिन्यांसाठी तहकूब करण्यात आला. दरम्यान, विरोधकांचा मात्र हा विषय मंजूर करण्यासाठी आग्रह होता. महापौर उषा ढोरे दबावाखाली काम करत आहेत. एकतर्फी सभागृह चालविले जाते. अन्याय केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी केला.

खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नूकसानभरपाई देण्याची कार्यपद्धतीत व धोरण महापालिकेने 2013 मध्ये निश्चित केले आहे. त्यात सन 2015 मध्ये बदल करण्यात आला होता. आता सत्ताधारी भाजपने पुन्हा या धोरणात नव्याने बदल करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीत 27 नोव्हेंबर 2019 रोजी पारित करण्यात आला आहे.

या ठरावावरुन भाजप नगरसेवकांमध्ये दुफळी आहे. या ठरावावरुन महासभा वारंवार लांबणीवर टाकली जात होती. या विषयावरील मतभेदांमुळे सोमवारी मात्र हा ठराव एप्रिलपर्यंत तीन महिन्यांसाठी तहकूब करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हा विषय मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. हा विषय चुकीच्या पद्धतीने तहकूब केला जात आहे. शहराच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी विषय तहकूब केला जाऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी केली. महापौर उषा ढोरे दबावाखाली काम करत आहेत. एकतर्फी सभागृह चालविले जात आहे. अन्याय केला जात आहे, असा आरोपही गव्हाणे यांनी केला.

खासगी वाटाघाटीच्या विषयावरुन मोठी पेपरबाजी झाली आहे. नगरसेवकांना चोर म्हटले आहे. त्याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.