Pimpri: ‘राजसाहेबांचे आशीर्वाद घेतले, पण दैवत महेशदादाच !’

एमपीसी न्यूज कट्ट्यावर महापौर राहुल जाधव

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला असून आपल्याला राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. एका कंपनीत वाहन चालक म्हणून काम करत असताना राज ठाकरे यांच्याकडून प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला. मनसेमुळेच मी नगरसेवक झालो. अन्यथा माझा राजकारणाशी संबंध आला नसता. त्यामुळेच शहरात आल्यानंतर भारतीय संस्कृतीनुसार मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेतल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच यावरून होणारे राजकारण खोडसाळपणाचे लक्षण आहे असे सांगत राजसाहेबांचे आशीर्वाद घेतले पण आमदार महेशदादाच आपले दैवत असल्याचे जाधव यांनी ठामपणे सांगितले. तसेच महापौर होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे आता कोणतीही अपेक्षा नसून आगामी काळात ‘महेशदादा म्हणतील तसे आणि दादा बोलणार तेच मी’ करणार असेही ते म्हणाले.

महापौर राहुल जाधव आज (मंगळवारी) ‘एमपीसी न्यूज’ कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना मनमोकळ्या पणाने उत्तरे दिली. ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, सहयोगी संपादक अनिल कातळे, उपसंपादिका स्मिता जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

मनसेचा नगरसेवक असताना सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही अपक्ष निवडणूक लढविणा-या महेशदादांचे काम केले. आम्ही सर्व सहक-यांनी त्यांना निवडणूक आणले. मनसेच्या विरोधात काम करून देखील राजसाहेबानी कोणतीही कारवाई केली नाही. पक्षांतर बंदीची कारवाई केली असती तर मी आज महापौर होऊ शकलो नसतो. त्यांच्या प्रेमामुळेच आणि ते शहरात आल्यानंतर प्रथम नागरिक या नात्याने त्यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले असे महापौर जाधव यांनी सांगितले.

भाजपची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागाला महापौरपद येणार म्हटल्यावर पहिल्यावेळी महापौर होईल असे 50 टक्के वाटले होते. परंतु, त्यावेळी या पदाने हुलकावणी दिली. स्थायी समिती निवडणुकीवेळी 100 टक्के सभापती होईल असे वाटले होते. परंतु, अचानक झालेल्या वेगळ्या निर्णयामुळे धक्का बसला होता. तरीही पक्षावरील आणि महेशदादावरील प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते असे सांगत महापौर जाधव म्हणाले, “शहराच्या दृष्टीने स्थायी समिती सभापती पदापेक्षा महापौरपद मोठे आहे. त्यामुळे देवालाच मला स्थायी समिती सभापती व्हावे असे वाटले नसेल. देवाला जे मान्य तेच माझ्या पदरात पडले आहे. त्यामुळे मी समाधानी आहे”

“संघर्षातून महापौरपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. मी महापौर झाल्याचा निसर्गाला देखील आनंद झाल्याने तो बरसला. त्यामुळे चिखल होऊन काहीजण पडले. त्यानंतर त्वरित मी दिलगिरी व्यक्त केली” तसेच कार्यकर्त्यांचा उत्साहाला लगाम घालू शकलो असे सांगत महापौर जाधव म्हणाले. “आजपर्यंत 24 महापौर आणि 34 स्थायी समिती सभापती झाले. निवडीनंतर कोणीही भंडारा उधळला नाही, असे कधीच झाले नाही. निवडणूकीनंतर प्रत्येकाने आंदोत्सव साजरा करत भंडा-याची उधळण केली आहे “असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.