Pimpri : महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत; 21 नोव्हेंबरला नवीन महापौरांची निवड

कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने 27 महापालिकांच्या महापौरांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिलेली तीन महिन्याची मुदवाढ 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत उद्या (बुधवारी) मुंबईत होणार असून 21 नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपरी महापालिकेचे आता केवळ अनुसुचित जाती (एससी) चे आरक्षण राहिले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ‘एससी’चे आरक्षण पडावे यासाठी या प्रवर्गातील नगरसेवकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. पिंपरीच्या महापौरपदासाठी कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने महापौर आरक्षण सोडत रखडली जाऊन महापौरांना पुन्हा मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती.

परंतु, राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत उद्या (बुधवारी) काढण्यात येणार आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात सोडत काढली जाणार आहे. त्याकरिता सर्व महापौर, स्थायी समिती सभापतींना निमंत्रित करण्यात आले आहे. पिंपरीच्या महापौरपदासाठी कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतर 21 नोव्हेंबर रोजी नवीन महापौर, उपमहापौरांची निवड होऊ शकते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीच पिंपरी महापालिकेने 2001 पासूनचा आरक्षणाचा सविस्तर तपशील राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला आहे. महापालिकेचे एकूण 32 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 128 आहे. सन 2011 च्या जनगणेनुसार महापालिकेची 17 लाख 27 हजार 810 लोकसंख्या आहे. तर, अनुसूचित जातीची दोन लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमाताची 36 हजार 535 लोकसंख्या आहे.

याबाबत बोलताना नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”महापौर आरक्षणाची सोडत उद्या (बुधवारी) मुंबईत होणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरला नवीन महापौर, उपमहापौरांची निवड केली जाईल. त्याकरिता विशेष सभा बोलविण्यात येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.