Pimpri : महापौरांची दादागिरी; माजी महापौर मंगला कदम भडकल्या 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव दादागिरीने सभागृहाचे कामकाज चालवित आहेत. विरोधकांना बोलू दिले जात नाही. चर्चेविना महत्वाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. भाजप चर्चेला घाबरत असून आर्थिक हितसंबंध जोपासण्यात पदाधिकारी दंग आहेत, असा गंभीर आरोप माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केला. तसेच शहरातील जनता भाजपला माफ करणार नसून आगामी काळात त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब आणि डिसेंबर महिन्याची नियमित सभा आज (गुरुवारी)पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी महापौर मंगला कदम यांनी बोलण्याची परवानगी मागून देखील महापौरांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे कदम चांगल्याच संतप्त झाल्या होत्या.

पत्रकारांशी बोलताना माजी महापौर कदम म्हणाल्या, आपण अडीच वर्ष महापौर पद भुषविले आहे. पाच वर्ष सभागृह नेता म्हणून काम केले आहे. मात्र, विरोधकांना कधी बोलण्यापासून मज्जाव केला नाही. चुका आमच्याकडूनही घडल्या असतील. परंतु, विरोधकांचा कधी दुस्वास केला नाही. त्यांना तुसडे पणाची वागणूक दिली नाही. आता मात्र उलटी परिस्थिती आहे. वरिष्ठ नगरसेवकांना बोलून दिले जात नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने निवडून येत आहे. याचा तरी महापौरांनी मान ठेवायला पाहिजे, असे खडेबोलही कदम यांनी सुनावले.

कदम म्हणाल्या, महासभेत आयत्यावेळी विषय आणून ते रेटून नेले जात आहेत. त्यामध्येच भाजपला अधिक रस आहे. भाजपचे काही नगरसेवक देखील सभागृहात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. याचे देखील सत्ताधा-यांना भान नाही. तुमचे बहुमत आहे. तुम्ही बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करतच आहेत. परंतु, आम्हाला बोलू द्या. आमचे म्हणने मांडू द्या. आम्हालाही जनतेने निवडून दिले आहे. भाजपला काही बोलले की मागे काही झाले. तुम्ही काय केले असे बोलतात. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन दोन वर्ष होत आले. तरीही मागचंच काढत बसत आहेत. यांनी दोन वर्षात काहीच काम केले नाही. त्यांना सांगण्यासारखे काहीच नाही.

तीन राज्यातील निवडणुकीत दादागिरी करणा-या भाजपला लोकांनी नाकारले आहे. हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बहुदा विसरले आहेत. शहरातील जनता भाजपला माफ करणार नाही. आगामी काळात धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही कदम म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.