Pimpri : अमरापूरकरांचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट सांगणा-या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे. नंदू माधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रेलर लॉंच करण्यात आला.

  • औरंगाबादमध्ये घडलेल्या सत्य घटनांनावर हा सिनेमा आधारित असल्याचे या ट्रेलरमधून दिसून येते. तत्कालीन आई इ एस अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या सिनेमाद्वारे, महाराष्ट्रातील तमाम प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचा वेध घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या, आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या विविध आव्हानांना ते कसे सामोरे जातात? हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

पूर्वापार पासून चालत आलेलं राहणीमान आणि पाश्चिमात्य शहरीकरणाचा रेटा यांमधील संघर्षाची कहाणी ‘पुरुषोत्तम’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

  • या सिनेमात नंदु माधव यांच्यासोबत किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.