Pimpri : करारातील अटींची पूर्तता करा अन्यथा, अण्णासाहेब मगर स्टेडियमचा ताबा द्या- भारती चव्हाण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये 1992 साली झालेल्या करारानुसार महानगरपालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळास सुमारे 5 कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी भूखंड द्यावेत, असे करारात नमूद करण्यात आले होते. एक तर करारातील अटींची पूर्तता करा, अन्यथा अण्णासाहेब मगर स्टेडियमचा ताबा द्या. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका आणि केंद्रीय कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण यांनी दिला.

अशा मागणीचे पत्र भारती चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त आणि भूमि जिंदगी विभाग यांना दिले आहे.

या पत्रात भारती चव्हाण यांनी म्हटले आहे, मनपा प्रशासन हे अण्णासाहेब मगर स्टेडियम पीपीपी तत्वावर देण्याचा घाट घालत आहे. 1992 साली करण्यात आलेला करार संपुष्टात आल्यामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील मनपा प्रशासनाचा मालकी हक्क देखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे महानगरपालिका स्वत: किंवा अन्य कोणत्याही खासगी विकसकाव्दारे स्टेडियम विकसित करण्याचा कायदेशीर अधिकार मनपा प्रशासनास राहिलेला नाही, असेही भारती चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच या विषयाबाबत कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. हा भूखंड पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला हस्तांतरीत करण्याचा घाट मनपा प्रशासन बेकायदेशीररीत्या करीत आहे. शहरातील कष्टकरी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या करारानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास 5 कोटी रुपये व शहरात पाच भूखंड मिळणे अपेक्षित होते. पिंपरी 1992 मध्ये स्टेडियम ताब्यात घेतल्या पासून आजतागायत मनपाकडून स्टेडियमच्या विकसनासाठी कोणत्याही प्रकारचा डेव्हलपमेंट प्लान तयार करण्यात आलेला नाही. मनपाकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे वाढीव बांधकाम या प्रकल्पात करण्यात आलेले नाही.

स्टेडियमची दुरवस्था झालेली असून राडा-रोडा टाकण्यासाठी सदर जागेचा डंपिंग ग्राउंडसारखा वापर केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कोट्यावधी रूपयांचा हा प्रकल्प धुळ खात पडलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांचे नावाने उभी असलेली ही वास्तू पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती असणा-या 28 एकर जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत 2 अब्ज रुपयांहून जास्त आहे. तरी मनपा प्रशासन कामगारांच्या या मागणीकडे अनेक वर्ष दुर्लक्ष करीत आहे.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या कामगारनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 27 वर्षापूर्वीपासून पाठपुरावा करीत असताना कामगार कल्याण मंडळास महानगरपालिकेकडून 28 एकर जागेच्या मोबदल्यात अवघे 20 हजार स्क्वे. फूटाचा एक भूखंड व एक कोटी रुपये ताब्यात मिळाले आहेत. उर्वरित चार कोटी घेऊन चार जागा घेणे हा प्रस्ताव कामगार कल्याण मंडळाच्या हिताचा नाही.

अण्णासाहेब मगर स्टेडियम कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात मिळावे हिच आमची मागणी आहे. तसेच उर्वरित चार जागांचा प्रस्ताव मंजूर केल्यास उर्वरित चार कोटी रुपये 1992 पासून आजपर्यंत व्याजासह दिल्यास सदर प्रस्तावांचा विचार होऊ शकतो, असेही भारती चव्हाण यांनी म्हटले आहे. या विषयाबाबत मनपा प्रशासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारती चव्हाण यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त व भूमी जिंदगी विभाग यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.