Pimpri: गणसंख्येअभावी विधि समितीची सभा तहकूब; डॉक्टरांचा विषय रखडला

Pimpri: Meeting of 'Law' Committee scheduled due to lack of quorum; The doctor's subject lingered

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधि समितीची पाक्षिक सभा गणसंख्येअभावी आज (सोमवारी) पुन्हा एकदा तहकूब केली आहे. त्यामुळे महापालिकेने भरती केलेल्या डॉक्टरांना कायम करण्यासाठीचा महत्वपूर्ण विषय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, आज तिस-यावेळी विधि समितीची सभा तहकूब करण्यात आली आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या भरतीसाठी महापालिकेने जाहिरात दिली होती. त्यासाठी रितसर निवड प्रक्रीयाही राबविण्यात आली. 3 डिसेंबर 2019 रोजी मुलाखत घेण्यात आल्या. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2020 रोजी निवड झालेल्या व प्रतिक्षेतील डॉक्टरांची यादी जाहिर करण्यात आली. तेव्हापासून हे सर्व डॉक्टर्स नियुक्ती पत्राची वाट पहात आहेत. निवड झालेले 60 डॉक्टर्स  तसेच तत्पूर्वी भरती केलेले डॉक्टर मिळून 103 जणांच्या नियुक्तीचा हा प्रश्न आहे.

प्रशासनाने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर महापालिका विधि समितीच्या संमतीसाठी हा विषय 4 मे रोजीच्या विषयपत्रावर मांडण्यात आला होता. ती सभा तहकूब करत 15 रोजी ठेवण्यात आली होती. 15 मे रोजी डॉक्टरांचा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. 15 मे रोजीची तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित केली होती. परंतु, आजही गणसंख्येअभावी विधि समितीची सभा तहकूब करण्यात आली आहे.

सभेसाठी केवळ समितीच्या सभापती अश्विनी बोबडे उपस्थित होत्या. गणसंख्या नसल्याने सभा तहकूब केली. यामुळे डॉक्टरांचा विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे. विधी समितीचा कार्यकाळ 14 जून संपणार आहे. त्यामुळे आजची तहकूब सभा आता 12 जून रोजी ठेवली आहे.

”डॉक्टरांना कायम करण्यासाठीचा विषय 4 मे 2020 रोजीच्या विधी समिती सभेसमोर ठेवला होता. त्यानंतर सभा झाली नाही. आजची सभा गणसंख्येअभावी तहकूब झाली आहे. ही तहकूब सभा 12 जून रोजी ठेवली असल्याचे” नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.