Pimpri: कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी 12 तारखेला पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली असून त्यावर चर्चा करण्यासाठी 12 ऑक्टोबरला शहरातील लोकप्रतिनिधी आणि पोलिसांची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहारासाठी 15 ऑगस्ट 2018 पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. परंतु, पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी नियंत्रणात आली नाही. गेल्या आठवड्यात हादरवून टाकणा-या दोन घटना शहरात घडल्या. हिंजवडीतील कासारसाई येथे उसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामध्ये एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच पिंपरी भाटनगर येथील सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन खून करण्यात आला.

या वाढत्या गुन्हेगारीचे महापालिकेच्या सभेत तीव्र पडसाद उमटले होते. महिला नगरसेवकांच्या तीव्र भावना दिसून आल्या. नगरसेवकांनी पोलिसांच्या कामकाजावर आक्षेप घेत हल्ला चढविला होता. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी यामध्ये पुढाकर घेतला आहे. त्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याबरोबर शहरातील आमदार, महापालिकेती पदाधिकारी आणि नगरसेवक यांची 12 तारखेला बैठक लावली आहे. चिंचवड अॅटो क्लस्टर येथे ही बैठक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.