Pimpri: मेट्रोच्या ‘बाऊंसर’ची स्थायी समिती सभापतींना दमबाजी!

उद्याची सकाळ बघणार नसल्याची धमकी; रात्री दहा ते दोन दरम्यान घडला प्रकार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी आणि पुणे महामेट्रोच्या कर्मचा-यांमध्ये मंगळवारी (दि. 9) मध्यरात्री चांगलीच वादावादी झाली. मेट्रोचे काम सुरु असल्याने कर्मचा-यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मडिगेरी यांची गाडी मोरवाडीतून महापालिका मुख्यालयाकडे जाऊन दिली नाही. यामुळे त्यांच्यात बाचाबाची सुरु होताच मेट्रोचे ‘बाऊंसर’ तिथे दाखल झाले. ‘बाऊंसर’ने मडिगेरी यांना दमबाजी केली. उद्याची सकाळ बघणार नसल्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री दहा ते मध्यरात्री दोनच्या दरम्यान मोरवाडीत महापालिका मुख्यालयासमोर घडला. दरम्यान, याप्रकरणी मडिगेरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्रोचे काम सुरु आहे. महापालिका मुख्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. विलास मडिगेरी मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास महापालिका भवनाच्या दिशेने आपल्या वाहनातून येत होते. त्यावेळी मोरवाडीतील अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ महामेट्रोच्या वतीने काम सुरु असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ‘बॅरिकेट्‌स’ लावून महामार्ग बंद केला होता. मडिगेरी यांना गाडी पुढे नेण्यास कर्मचा-यांनी मज्जाव केला. मी स्थायी समिती सभापती असून याठिकाणचे काम थोडावेळ थांबवून गाडी पुढे जाऊ देण्याची विनंती मडिगेरी यांनी कामगारांना केली. मात्र, तुम्ही वाहन पुढे नेऊ शकत नाहीत. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी अरेरावी कर्मचा-यांनी केली.

  • त्यामुळे कामगार आणि मडिगेरी यांच्यात वादावादी सुरु झाली. बाचाबाची सुरु असल्याची माहिती मिळताच महामेट्रोचे ‘बाऊंसर’ तिथे दाखल झाले. त्यांना ही बाब समाजवून सांगणण्याचा प्रयत्न करणा-या मडिगेरी यांना या ‘बाऊंन्सर’नी ‘मला माहित आहे, तू स्थायी समिती सभापती आहेस, फ्लेक्‍सवर फोटो पाहतो. इथून तत्काळ निघून जा, नाही. तर, तू उद्याची सकाळ पाहणार नाहीस’, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मडिगेरी यांनी सांगितले. मडिगेरी यांनी तत्काळ महापालिका, मेट्रो अधिका-यांबरोबरच पोलीस आयुक्तांना फोन लावून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर बीट मार्शल आणि पोलीस दाखल होताच बाऊंसरने पळ काढला.

याबाबत बोलताना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”कोणतीही रितसर परवानगी न घेता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्रोच्या ठेकेदारांकडून काम केले जात आहे. त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नाही. रस्ता बंद केल्यानंतर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. कामावर गुंड ठेवले जात आहेत. गुंडाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. स्थायी समिती सभापतीलाच महामेट्रोच्या गुंडांकडून अशी वागणूक मिळत असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना याचा किती त्रास सहन करावा लागत असेल. या मनमानी कारभाराला पायबंद घालणार आहे. जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्यांचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आयुक्तांनी 24 तासात महामेट्रोकडून मागविला अहवाल!
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याप्रकरणाचा अहवाल मागविला आहे. येत्या 24 तासात सविस्तर अहवाल देण्याचे आदेश त्यांनी महामेट्रोला दिले आहेत. तसेच महामेट्रोने रस्ता बंद केल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

याबाबत बोलताना पुणे महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महाप्रबंधक हेमंत सोनवणे म्हणाले, ”असा काही प्रकार घडला आहे का? याची चौकशी सुरु आहे. महामेट्रोचे काम नियमानुसारच केले जात आहे. पोलिसांकडून परवानगी घेऊनच रात्री बॅरिकेट्‌स लावून रस्ता बंद केला जातो. त्याठिकाणी दिवसा काम करु शकत नाही. त्यामुळे रात्रीच काम केले जाते. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरु आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.