Pimpri : मेट्रोचे पुणे, पिंपरी-चिंचवड असे नामकरण, अजितदादांचे महासभेत अभिनंदन

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोले दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे नाव दिल्याबद्दल पिंपरी महापालिकेच्या सभेत अजित पवार यांचे सोमवारी (दि. 20) महासभेत अभिनंदन करण्यात आले.

_PDL_ART_BTF

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या वर्षभरात पिंपरी ते शिवाजीनगर, स्वारगेटपर्यंत मेट्रो चालू होईल. या मेट्रोचे नामकरण पुणे महामेट्रो असे करण्यात आले आहे. मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवड शहराच्या नालाचा उल्लेख केला गेला नव्हता. मेट्रोला पिंपरी-चिंचवड शहराचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी महाविकासआघाडी सरकारकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री, तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे आदेश दिले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांना तसे निर्देश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे नाव दिले जाणार आहे. पिंपरी-चिंचवडचे नाव दिल्याबाबत महासभेत अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मांडला. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सभागृहाच्या वतीने अजितदादांचे अभिनंदन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.