Pimpri: पूरग्रस्त सात हजार लोकांचे स्थलांतर; गरजेनुसारच नागरिकांनी बाहेर पडावे; महापालिका आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज -चिंचवड ते दापोडी आणि पिंपळेगुरव ते दापोडी हा संपूर्ण परिसर पाण्याने बाधित झाला आहे. पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. शहरवासीयांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. शहरवासीयांच्या सेवेत दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. गरजेनुसारच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, मुसळधार पावसामुळे पवना धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पूराच्या पाण्याने थैमान घातले. मागील दोन दिवसात सुमारे सात हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.

  • थेरगाव येथील पवना नदीवरील पूल, मुळा नदीवरील सांगवीतून स्पायसर कॉलेजकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, चिंचवडगाव, वाकड या भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पिंपरी-चिंचवडचा औंध मार्गे पुण्याचा संपर्क तुटला आहे.

थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयासमोरील पुुलावरुन पाणी वाहू लागल्याने दुपारी चारनंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. हॅरीस पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने या मार्गावर संथगतीने वाहतूक सुरू होती. अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.

  • महापालिकेच्या सुमारे दीड हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एनडीआरएफ व पोलीस कर्मचारी बचाव कार्यासाठी चोविस तास तैनात आहेत. महापालिकेच्या लिपिकांपासून ते इंजिनिअरपर्यंत सगळ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या सहा बोटींसह, एनडीआरएफची एक बोट तसेच पूरात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी दोन देवदूत वाहनांचा वापर नागरिकांच्या बचाव कार्यासाठी करण्यात येत आहे.

कालपासून स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या सात हजारांवर पोहचली आहे. दापोडी परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. पवार वस्ती, दापोडी गावठाण, बॉम्बे कॉलनी पुर्णतः जलमय झाली आहे. बोपखेलमधील सुमारे दोनशे नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. सांगवीतील मधुबन सोसायटी, मुळानगर मधील साडेसातशे नागरिकांचे आज स्थलांतरण करण्यात आले.

  • महापालिकेच्या कासारवाडी येथील आयटीआयपर्यंत पवनेचे पाणी शिरले आहे. वाकडमधील कस्पटेवस्तीत पाणी शिरले असून शिक्षक कॉलनी पुुर्ण पाण्यात गेली आहे. रहाटणी येथील सहाशे तर वाल्हेकरवाडीतील 50 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या मदतीने दापोडीतील आठ जणांना बोटीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.