Pimpri : उद्योगनगरीचे दहशतवाद कनेक्शन अधोरेखित

एमपीसी न्यूज- जगामध्ये वाढत असलेल्या दहशतवादाच्या उंबरठ्यावरून उद्योगनगरीकडे पहिले असता येथील स्थानिक पातळीवरील दहशतवाद उघड झाला आहे. अतिरेकी भटकळ बंधूंची कुदळवाडी वास्तव्याची शक्यता, शहरात अनेकदा कधी छुप्या तर कधी उघडपणे होणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाया. त्यातच स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असणाऱ्या दहशतवाद्याला नुकतेच चाकण परिसरातून शस्त्रासह केलेली अटक अशा केली होती. त्यानंतर त्याच परिसरातून पुलवामा हल्ल्याशी संबंधित असणाऱ्या शरीयत मंडल नामक बांगलादेशी दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याने उद्योगनगरीचे दहशतवाद कनेक्शन पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मार्च २०१८ मध्ये पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना एटीएसने अटक केली होती. २०१० मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने पुणेच नव्हे, तर देश हादरला. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर काही अंतराने बॉम्बस्फोट झाले; पण त्यात काही तांत्रिक चूक राहिल्याने ते फसले. यात रियाझ-यासीन भटकळ यांचा हात होता. या भटकळ बंधूंचे पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात वास्तव्य असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

संशयित नक्षलवाद्यांच्या महिला प्रतिनिधीला पौड परिसरातून अटक करण्यात आली होती तर तिची सहकारी भोसरीत राहत असल्याचे उघड झाले होते. नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल ,दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या बांगलादेशींचे बनावट कागदपत्रांद्वारे शहरातील वास्तव्य अनेकदा तपास यंत्रणेने उघड केले आहे. तर आयटी हब असणाऱ्या हिंजवडीतील एका कंपनीचे संकेतस्थळ दहशतवाद आणि लवजिहादचे समर्थक असणाऱ्या फल्लागा या दहशतवादी संघटनेने हॅक केल्याने खळबळ उडाली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ल्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. दरम्यान पिंपरी-चिंचवडच्या वेशीवर वसलेल्या चाकणमध्ये झालेल्या एटीएसच्या लागोपाठ कारवाईमुळे दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड हिटलिस्टवर येत असल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियातून होतोय ब्रेनवॉश

सोशल मीडियावर काही दहशतवादी संघटनांकडून नागरिक विशेषतः तरुण तरुणींचे ब्रेन वॉश करण्याची कामे केली जातात. याला काहीजण बळी पाडल्याचीही उदाहरणे आहेत. तर दहशतवादी संघटनांचे व्हिडीओ पाहण्याचे प्रमाणही वाढत आहे. अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याला संघटना मजबूत करण्याचे काम दिले गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अनेक अतिरेकी संघटना सोशल मीडियातून जाळे विनंती असल्याची दाट शक्यता आहे.

एटीएसद्वारे जनजागृती

स्थानिक पातळीवर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एटीएसकडून शॉर्ट फिल्म बनवून त्या व्हायरल करण्यात येणार आहे. अनेक लिंकचा वापर करून काही संघटना मोबाईलद्वारे आपली माहिती व डेटा मिळवू शकतात यामुळे अनोळखी लिंक ओपन करू नये. दहशतवाद आणि अतिरेकी संघटनांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा संशय आल्यास एटीएसला (दहशतवाद विरोधी पथक) संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.