Pimpri: ‘राजमुद्रा स्टिकर’चा गैरवापर करणा-या तोतयांवर कारवाई करा’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आमदारासांठी सरकारकडून दिले जात असलेल्या ‘राजमुद्रा स्टिकर’चा गैरवापर होत आहे. आमदारांच्या काही कार्यकत्यांच्या गाडीवरती ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ अशा आशयाचे चिन्ह सर्रास वापरले जात आहे. या स्टिकरचा गैरवापर होत असून अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांना पत्र दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, सुरक्षितेच्या दृष्टीने विधानसभा सदस्यांच्या वाहनासाठी शासनाकडून स्टिकर पुरविले जाते. ते विधानसभा सदस्यांनी आपल्या स्व:तच्या मालकीच्या व नेहमीच्या वापरातील वाहनावर लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे विधानसभा कामकाजाच्या ठिकाणी, मंत्रालये येथे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या सन्मानियांना सुलभ प्रवेश मिळणे सुकर व्हावे हा त्यामागचा हेतू आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात तीन विधानसभा सदस्य आहेत. परंतु पूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात विशेषतः भोसरी, चिखली, मोशी परिसरामध्ये जागोजागी विधानसभा सदस्य आणि राजमुद्रा अशा आशयाचे स्टिकर वाहनांच्या दर्शनी भागावर व मागील काचेवर लावून वाहने फिरत आहेत. ही वाहने विधानसभा सदस्यांची नसून त्यांच्या कार्यकर्त्यांची आहेत असा दाट संशय आहे. महापालिका मुख्यालयात सुध्दा ही वाहने आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या स्टिकरचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.