Pimpri: आमदार, प्राधिकरण अध्यक्षांना भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षांकडून घरचा आहेर; संबंधितांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – स्वपक्षाचे आमदार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांवर भाजपच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्षांनी गंभीर आरोप करत घरचा आहेर दिला आहे. आमदार ‘टीडीआर’ किंग असून त्यांचे हस्तक प्राधिकरण कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष हे तर साडेबारा टक्के जमीन परताव्यासाठी संबंधित शेतकरी आणि बिल्डर यांच्यात आर्थिक देणे-घेणे ठरवून साठेखत करून घेत असल्याचा आरोप करत शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहेत. त्यात सचिन काळभोर यांनी म्हटले आहे. प्राधिकरणाने 1972 मध्ये  शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या. बाधित शेतक-यांना जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के जमीन परतावा मिळणे कायद्याने बंधनकारक आहे. अनेक वर्षानंतर त्याबाबत आपण तोडगा काढला. मात्र, बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के जमीन परतावा मिळण्यापूर्वीच जागेचे साठेखत करून बिल्डरांना विकल्या जात आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष शेतकरी आणि बिल्डर यांच्यात आर्थिक देणे-घेणे ठरवून साठेखत करून घेत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत बोलताना प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले, ”साडेबारा टक्क्के परतावा देण्याची फाईल अद्यापही आली नाही. त्याची प्रक्रियाही सुरु झाली नाही. त्यामुळे आरोपांमध्ये काही तथ्थ नाही. बिनबुडाचे आणि  चुकीचे आरोप आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.