Pimpri : आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचा ‘लाईव्ह वेबिनार’द्वारे तीनशे गृहनिर्माण सोसायट्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषीत करून ज्या काही सूचना किंवा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, त्या कसोशीने पाळा. सध्याचा काळ कठीण आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून शहरात पुढील सात दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही परिस्थिती सामान्य करायचे की नाही हे आपल्याच हातात आहे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील सुमारे 300 गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांना रविवारी (दि. 19) आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आयोजित केलेल्या ‘लाईव्ह वेबिनार’मध्ये आमदार जगताप यांनी सुमारे ३०० गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधून हे आवाहन केले.

सुमारे एक तास झालेल्या या वेबिनारमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, जिल्हा उपनिबंधक नारायण आढाव हे सुद्धा सहभागी झाले होते. या सर्वांनी लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे संवाद साधून गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये लॉकडाऊनबाबत असलेल्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “रविवारी मध्यरात्रीपासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोघांनीही हा निर्णय घेतला आहे. आपल्या चांगल्या भविष्यासाठी नागरिकांनी या सात दिवसांमध्ये प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गृहनिर्माण सोसायट्यांपुढे महापालिकेच्या मालमत्ता करांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेने कर भरण्याची जूनपर्यंत सवलत दिली आहे. त्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. त्यामुळे सोसायट्यांमधील नागरिकांनी जूनपर्यंत कराचा भरणा केला तरी चालू शकते. मालमत्ता करामध्ये सूट देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”

पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले, “शासनाने लॉकडाऊनच्या काळात पिंपरी-चिंचवड शहराला कंनेन्ट एरिया म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे शहराला उद्योग सरू करण्याच्या सवलती लागू नाहीत. पुढील सात दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना अनेक निर्बंध लावले जातील. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि दुचाकीवरून फक्त एकालाच प्रवास करता येईल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिवसांतून फक्त दोन ते तीन तासच खुली ठेवता येतील. या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांना काही स्वयंसेवकांचीही गरज आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने पोलिस प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.”

शैलेंद्र बिरथरे यांनी लाईव्ह वेबिनारची तांत्रिक बाजू सांभाळली. वेबिनारचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे, सचिन लोंढे, सुधीर देशमुख, दत्तात्रय देशमुख, अरूण देशमुख यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.