Pimple Gurav : ‘जादुई शर्ट’ बनविणाऱ्या महेश रेड्डीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी महेश रेड्डी यांनी महिलांचे संकट काळात संरक्षण करणारा जादुई शर्ट बनविला आहे. त्याच्या या संशोधनाचे भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी विशेष कौतुक केले आहे. आमदार जगताप यांनी महेशचा सत्कार करत त्याला वेगवेगळ्या संशोधनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महेश रेड्डी हा पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याला विज्ञानाची विषेश आवड आहे. त्यातूनच त्याने महिलांच्या सुरक्षेसाठी काही तरी उपकरण तयार करण्याचा विचार केला. त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून एक शर्ट बनविला आहे. त्या शर्टला त्याने ‘जादुई शर्ट’ असे नाव दिले आहे. रबर, कापड, ट्रान्झिस्टर आणि विजवाहक वायरचा वापर करून अवघ्या ३०० रुपयांत हा शर्ट बनविला आहे. रात्री-अपरात्री फिरणाऱ्या एखाद्या महिलेने हा शर्ट घातल्यास तिचे संरक्षण करू शकेल, असा शर्ट महेशने बनविला आहे.

या शर्टवर वीज प्रवाहित करणारे बटन त्याने बसविले आहे. हा शर्ट घातलेल्या महिलेने संकट काळात शर्टवरील बटन दाबल्यानंतर वीज प्रवाहित होते. त्यामुळे हात लावणाऱ्याला विजेचा धक्का बसेल. त्याच्या या संशोधनासाठी शाळेच्या शिक्षकांनी त्याला मदत व मार्गदर्शन केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात महेशने बनविलेला ‘जादुई शर्ट’ विशेष आकर्षण होते.

तसेच त्याच्या संशोधनाला जिज्ञासा या संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार मिळाला आहे. महेशच्या या संशोधनाचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच त्याचा सत्कारही केला. यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. मला भविष्यात विविध विषयांवर संशोधन करायचे असल्याचे महेशने यावेळी सांगितले. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी महेशला दिले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.