Pimpri : अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यासाठी घेतली आमदार लांडगे यांची भेट -शीतल शिंदे

एमपीसी न्यूज – पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत आहे. कोअर कमिटीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? हे विचारण्यासाठी तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली असल्याचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शीतल शिंदे यांची वर्णी लागल्यापासून त्यांची निवड होणार तसा हिरवा कंदील पक्षश्रेष्ठींकडून दाखविण्यात आला होता. श्रीमंत महापालिकेची तिजोरी समजल्या जाणा-या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या जुन्या गटातील विजय उर्फ शितल शिंदे यांच्याच नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण, ऐनवेळी विलास मडिगेरी यांनी अर्ज भरला. त्यामुळे नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला.

  • माझ्यामागे पक्षाचे 30 ते 40 नगरसेवक आहेत. त्यामुळे बंडखोरी करून अर्ज भरल्याचे भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच पक्षाने कारवाई केल्यास त्याला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

याबाबत नगरसेवक शीतल शिंदे म्हणाले, “कोअर कमिटीने निर्णय का बदलला? हा प्रश्न विचारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे धाव घेतली. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम आहे, असे पक्षश्रेष्ठी वारंवार सांगतात. भाजप पक्ष शिस्तप्रिय समजला जातो. परंतु पक्षात शिस्त दिसत नाही? हा सवाल आमदार महेश लांडगे यांना विचारला. मी दुस-यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो असून यापूर्वीही स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक होतो. त्यावेळीही मला डावलले. तर, विलास मडिगेरी प्रथमच निवडून आले असून त्यांचा स्थायीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असताना देखील त्यांना संधी देण्यात आली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “पक्षश्रेष्ठींनी देखील निर्णयाअंतर्गत चालायला हवे. पक्षश्रेष्ठीच असे वागले तर कार्यकर्तेही तसेच वागणार. सर्व नियमानुसार होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.