Pimpri: आजी-माजींमध्ये लढत; प्रचारामधील रंगतीमुळे निवडणुकीत चुरस

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत होत असून प्रचारामधील रंगतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दुहेरी होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांकडून विकासाच्या मुद्यावर भर दिला जात आहे. दोघांकडूनही प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैंकी पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरातील हा सर्वांत लहान मतदारसंघ आहे. सुशिक्षीत आणि झोपडपट्टी असा दोन्ही भाग या मतदारसंघात येतो. मतदारसंघात 3 लाख 53 हजार 545 मतदार आहेत. 2009 मध्ये अस्तित्वात आलेल्या मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पहिल्यांदा तर 2014 मध्ये शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी विधीमंडळात प्रतिनिधीत्व केले. यावेळीही पुन्हा दोन्ही प्रतिस्पर्धी आमने-सामने ठाकले आहेत. फरक एवढाच की आता युती आहे. गेल्यावेळी युती नव्हती.

शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून अण्णा बनसोडे, भाजप बंडखोर बाळासाहेब ओव्हाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड यांच्यासह 18 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. नगरसेवकांचे बळ आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी असल्याने कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिल्यामुळे बनसोडेंची ताकद वाढली आहे.

लोकसभेला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरीतून मताधिक्य मिळाले होते. तसेच भाजप-शिवसेना महायुतीमधील प्रमुख बंडखोरांनी माघार घेतली आहे. मागच्या निवडणुकीत तिरंगी लढतीत 47,266 एवढी मते मिळविणाऱ्या आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यावेळी चाबुकस्वार यांच्याबरोबर आहेत. महायुतीमध्ये एकजुटीचे वातावरण निर्माण झाले. महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित आणि जोमाने प्रचार करत आहेत. भाजपची ताकद ही चाबुकस्वारांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली आहे. महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला गेल्यास चाबुकस्वारांना विजयाची खात्री वाटते.

शहरात सर्वाधिक 18 जण पिंपरीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवार जास्त असल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतविभाजनाचा फायदा कोणाला होतो, वंचितचा फटका कोणाला बसतो, यावर पिंपरीच्या विजयाचे चित्र अवंलबून आहे.

2014 मधील निकाल
अॅड. गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – 51,096
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 48,761
चंद्रकांता सोनकांबळे (‘आरपीआय’) – 47,266

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.