Pimpri: घरटी 60 रुपये कचरा शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारणीस सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून शुल्काची आकारणी केली जात आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसेने आज (बुधवारी) महापालिकेत आंदोलन केले. ‘कचऱ्यावर पैसे घेणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, कचरा आकारणी शुल्क गोळा करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, महापौरांचे करायचे काय खाली डोके वर पाय, लुटारू आयुक्तांचे, सत्ताधाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहाच्यासमोर करण्यात आले. सभागृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अंकुश तापकीर, रुपेश पटेकर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

…असे आकारले जात आहे शुल्क

प्रति घर दरमहा घरटी 60 रुपये, दुकानदार, दवाखाने यांच्याकडून 90 रुपये, शोरुम (उपकरणे, फर्निचर, ऑटोमोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स), गोदामे, उपाहारगृहे व हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 160 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल, रुग्णालये 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 50 खाटांपेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 160 रुपये आणि 50 हून अधिक खाटा असलेल्या रुग्णालयासाठी 240 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक, धार्मिक संस्था, वसतीगृहे, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 120 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.